

रायगड ः सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत सोमवारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे काढण्यात आली आहे. पालकांना आरटीई प्रवेश प्रक्रियेत आपल्या पाल्याची निवड झाली की नाही हे 10 एप्रिल रोजी समजणार आहे. रायगड जिल्ह्यात 270 शाळांमधील 4 हजार 784 जागांसाठी 9 हजार 502 अर्ज प्राप्त झाले आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनला ईन पद्धतीने राबविली जाते. यंदाही ही आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरण्यास 17 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती.
अर्ज भरण्यासाठी पालकांना 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार राज्यात 1 लाख 14 हजार 826 जागांसाठी राज्यभरातून 2 लाख 89 हजार 289 पालकांनी आपल्या पाल्याचे आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले असून, या सर्व अर्जांमधून संगणकीय पद्धतीने पारदर्शक लॉटरी काढण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी शुक्रवार, 10 एप्रिल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्या त येणार आहे. त्यासह निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दुरध्वनी क्रमांकावर संंदेशाद्वारे (एसएमएस) कळविले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून दिली जात आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळेत निश्चित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित जागा पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत राबविली जाणार आहे.
पालकांना शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही अफवा, गैरसमज किंवा मध्यस्थांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत संकेतस्थळ व शासकीय माध्यमांवरूनच माहिती घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे. आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित महानगरपालिका शिक्षण विभाग, तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
पालकांना आरटीई प्रवेश प्रक्रियेत आपल्या पाल्याची निवड झाली की नाही हे 10 एप्रिल रोजी समजणार आहे.
रायगडमध्ये 270 शाळा
रायगड जिल्ह्यातील 25 टक्के आरटीई राखीव जागांच्या प्रवेशासाठी, 270 शाळांमधील चार हजार 784 जागांसाठी नऊ हजार 502 अर्ज प्राप्त झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षण विभागाने अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. सोमवार, 6 एप्रिल 2026 रोजी या प्रवेशाची लॉटरी (सोडत) जाहीर करण्यात आली असून, प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी थेट यूट्युब प्रक्षेपण करण्यात आले.