

मुंबई: गेट वे ऑफ इंडियाची बेस्ट बस सेवा बंद पाडण्याचा डाव बेस्ट समितीने सोमवारी हाणून पाडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्रानंतर बेस्ट प्रशासनाने सोमवारी येथील बेस्ट थांबा स्थलांतराचा प्रस्ताव समितीत मांडला. मात्र सदस्यांनी याला तीव्र आक्षेप नांदवला. गेट वे ऑफ इंडियावर जाण्यासाठी शेअर टॅक्सीला परवानगी मग बेस्ट बसेसला बंदी का असा संताप व्यक्त केल्यानंतर हा प्रस्ताव बेस्टच्या अध्यक्षांनी अखेर परत पाठवला.
देश आणि विदेशातून येणारे पर्यटक व मुंबईकर यांना गेट वे ऑफ इंडिया येथे जाण्यासाठी बेस्टची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील डेपोतून आणि चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरून ए- 112 आणि ए-116 या दोन बस गाड्यांची सेवा दिली जाते. याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना तसेच दक्षिण मुंबईत नोकरी धंद्यासाठी प्रवास करणाऱ्यांनाही होत असतो.
त्यामुळे हे दोन्ही मार्ग बेस्टचे फायद्याचे मार्ग म्हणून ओळखले जातात. असे असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 11 मार्च रोजी बेस्ट महाव्यवस्थापकाना पत्र पाठवत गेटवे जवळील हा थांबा पुढे म्युझियम समोरील जागेत स्थलांतरित करावा, अशी सूचना केली आहे. या पत्राच्या अनुषंगाने बेस्ट प्रशासनाने समितीसमोर हा प्रस्ताव सोमवारी सादर केला.
त्यावर समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. देशभरातून येणारे पर्यटक या बस सेवेचा लाभ घेतात. या बस कधीही रिकाम्या धावत नाहीत. चांगला महसूल मिळत असताना बेस्ट हा बस थांबा का स्थलांतरित करीत आहे, राहुल नार्वेकर यांना टॅक्सीवाल्यांचा एवढा पुळका का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
तसे झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला. सुमित अहिर यांनी लाखो लोक या बेस्ट बसने गेट वेला येतात. त्यामुळे हा थांबा स्थलांतरित करू नये अशी मागणी केली. तर प्रवीणा मोरोजकर यांनीही ठरावाला तीव्र विरोध दर्शवला.
समिती सदस्यांचा प्रखर विरोध
लक्षात घेता अखेर गेटवे जवळील शेअर टॅक्सी बंद करून फक्त बेस्ट बस गाड्या सुरू ठेवा, असे सांगत बेस्ट अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी हा प्रस्ताव परत पाठवला. त्यावरही सदस्यांनी आक्षेप घेत हा प्रस्तावच नामंजूर करा, असा आग्रह नितीन नांदगावकर यांनी केला. मात्र मी आता प्रस्ताव रेफर बॅकचा आदेश दिल्याने पुढच्या बैठकीत ठराव परत आल्यावर नामंजूर करू, असे विश्वासराव यांनी शेवटी स्पष्ट केले.
नार्वेकरांची सूचना काय ?
बेस्ट बस क्र. ए- 112 आणि ए-116 या दोन्ही बस गाड्यांचा गेट वे जवळील बस थांबा स्थलांतरित करून तो म्युझियम समोरील जागेत हलवा. तसेच प्रवाशांना पुढे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात थांबा द्या, अशी नार्वेकर यांची सूचना होती.
दर रविवारी तिकिटातून बेस्टला 1 लाख 98 हजारांचा महसूल
गेट वे ऑफ इंडियाला जाणाऱ्या बेस्ट बस क्र. ए- 112 आणि ए-116 या दोन्ही बसच्या दररोज 436 फेऱ्यांमधून 24 हजार प्रवासी प्रवास करतात. त्यातून सरासरी एक लाख 17 हजार रुपये इतका महसूल मिळतो. तर दर रविवारी फेऱ्यांची संख्या 598 असते. त्यातून एक लाख 98 हजार इतका महसूल मिळतो.