

मुंबई/रायगड ः जानेवारी महिन्यातील चौथ्या शनिवारपासून रविवार आणि सोमवारी प्रजासत्ताक दिन अशा सलग तीन दिवस सुट्ट्या लागून आल्याने मुंबईकरांनी पुणे आणि कोकणात जाण्याचा निर्णय घेतल्याने शनिवारी सकाळपासूनच रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. किमान पाच किमी अंतरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर यामुळे प्रवासी आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडखळजवळ, तर इंदापूर व माणगाव येथे सकाळी 9 वाजल्यापासून तब्बल तीन ते चार तास भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोलाड ते इंदापूर सीएनजी पेट्रोल पंप पोटनेर या संपूर्ण पट्ट्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीस महामार्गाचे अपूर्ण व रखडलेले काम, अरुंद रस्ता तसेच काही ठिकाणी कामाचे सुरू असलेले अडथळे हे कारण असले तरी वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम न पाळणे हेही मोठे कारण दिसून आलेे.
बोरघाटात वाहने पडली बंद
सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील खालापूर टोलनाक्यावर शनिवारी सकाळपासून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली होती.अनेक तास वाहनांच्या रांगा लागल्याने अखेर वाहनचालकांनी जुन्या महामार्गावरून वाहने वळविल्याने पेण-खोपोली रस्त्यावरील साजगांव फाटा,शिळफाट्यावर वाहतूक कोंडी झाली होती. बोरघाटात वाहनांची रांग लागल्याने अनेक वाहने बंद पडल्याने घाट जाम झाला होता.
दोन तासांच्या प्रवासाला लागले पाच तास
तीन दिवस सुट्टी असल्याने मुंबई महानगर,उपशहरातील लोक पुण्याकडे सुट्टी साजरी करण्यासाठी निघाले आहेत.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खालापूर टोलनाक्यावर शनिवारी सकाळपासून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खंडाळा घाट परिसरात वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
काही ठिकाणी चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहने अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेहमी दोन ते अडीच तासांत पूर्ण होणारा प्रवास अनेक प्रवाशांना चार ते पाच तासांहून अधिक वेळ घेत असल्याचे दिसून आले. यामुळे प्रवाशांचा संयम सुटत असून उष्णता, तहान आणि थकवा यांचा सामना करावा लागत आहे,तर महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.