

मुंबई : क्षुल्लक वादातून आलोककुमार सिंग (30) या कॉलेज प्राध्यापकाची अज्ञात व्यक्तीने हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी मालाड रेल्वे स्थानकात घडली. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.
आलोककुमार विलेपार्ले येथील एन. एम. कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहात होते. शनिवारी सायंकाळी ते विलेपार्ले येथून कांदिवलीतील घरी जाण्यासाठी निघाले होते. बोरिवली लोकलने प्रवास करताना त्यांचा एका सहप्रवाशासोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता.
या वादातून त्याने त्यांच्यावर हत्याराने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, बोरिवली रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. हत्येनंतर आरोपी पळून गेल्याने रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.