

मुंबई : नजीकच्या भविष्यात महागाईवाढीचे संकेत देतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.२५ टक्का (पाव टक्का) वाढीची घोषणा दिली. रेपो दर आता ५.५० टक्के करण्यात आला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण जाहीर केले. साडेतीन वर्षांनंतर झालेल्या या रेपो दरवाढीमुळे सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. कारण, या दरवाढीमुळे कर्जे महागणार असून रेपो रेटशी जोडलेले गृह, वाहन तसेच इतर सर्व प्रकारच्या कर्जांचा ईएमआय वाढणार आहे. एवढेच नाही तर नवीन कर्ज घेणेदेखील महागणार आहे.
५ ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी मिटिंग सुरू होती. त्यात रिझर्व्ह बँकेच्या समितीने व्याज दरांबाबत मोठा निर्णय घेतला. मल्होत्रा म्हणाले, व्याज दर वाढवण्याच्या या निर्णयाला ‘एमपीसी’च्या सहापैकी चार सदस्यांचा पाठिंबा आहे. व्याज दरातील वाढीशिवाय, आरबीआयने आपल्या मौद्रिक नरमाईच्या भूमिकेपासूनही माघार घेतली आहे. मध्यवर्ती बँकेने आपली भूमिका बदलून ‘संतुलित कठोरता’ केली आहे.
रिझर्व्ह बँकेने २०२७ साठी रिअल जीडीपी ग्रोथचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ७.१ टक्के केला. सोबतच, दुसर्या तिमाहीसाठी हा अंदाज ७.२ टक्के, तिसर्या तिमाहीसाठी ६.९ टक्के केला गेला. चौथ्या तिमाहीसाठी मात्र ६.८ टक्के हा अंदाजच कायम ठेवला. बँकेने २०२६-२७ साठी महागाई दर ४.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला.
बाह्य आव्हाने आणि वाढत्या महागाईच्या धोक्यांना पाहता नजीकच्या भविष्यात व्याज दर कपातीची शक्यता नाही, असे सांगून मल्होत्रा म्हणाले, व्याज दर ठरवणारी समिती एक तर दर स्थिर ठेवेल किंवा ते वाढवेल, हे व्यापक आर्थिक परिस्थिती बदलण्यावर अवलंबून असेल.
रेपो रेट वाढीचा गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होईल. फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज घेणार्यांचा ईएमआय वाढेल. उदा., एखाद्याने २५ वर्षांसाठी ७.५ टक्के व्याज दराने ५० लाखांचे गृह कर्ज घेतले असल्यास त्याचा मासिक हप्ता ३६,९५० रुपये येतो. २५ वर्षांत ग्राहकाला सुमारे ६०.८५ लाख रुपये व्याज भरावे लागेल. परंतु, आता रेपो रेट वाढल्याने बँकेच्या गृह कर्जाचा व्याज दर वाढू शकतो. यामुळे त्याचा गृह कर्जाचा व्याज दर ७.७५ टक्के होऊ शकतो. यामुळे ईएमआय वाढून सुमारे ३७,७६६ रुपये होईल. याचा अर्थ कर्जाच्या मुदतीत बदल न केल्यास कर्जदारास दरमहा ८१७ रुपये जास्त द्यावे लागतील.
• रेपो दर : ५.५० टक्क्यांवर पोहोचला.
• ईएमआय : मासिक हप्ते वाढणार.
• कर्जाचे प्रकार : गृह, कार, वैयक्तिक कर्जे महागणार.
• ठेवी : एफडीवरील व्याज दर वाढण्याची शक्यता.
• बजेट नियोजन : ईएमआयनुसार मासिक खर्च आखा.
• प्री-पेमेंट : मुद्दल रक्कम काही प्रमाणात भरा.
• कर्ज कालावधी : मुदत वाढवण्याचा पर्याय तपासा.
• रि-फायनान्सिंग : कमी व्याज दर देणाऱ्या बँकेकडे कर्ज ट्रान्स्फर करा.
ऊर्जेचा वाढता खर्च व खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या वाढत्या किमती महागाई वाढवत आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा बळावण्यासह क्रूड ऑईलच्या किमतींत अस्थिरतेमुळे आर्थिक वातावरण बिघडले आहे. जागतिक वाढ मजबूत असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा ती मंदावली आहे. महागाई वेगाने वाढण्याचा अंदाज असल्याने जगभरातील मध्यवर्ती बँकांना मॉनिटरी पॉलिसी कठोर करावी लागत आहे.
संजय मल्होत्रा, गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँक