

Reading Culture In Digital Age
मुंबई : हल्ली पुस्तके वाचतो कोण किंवा मराठी पुस्तकांचे काही खरं नाही, असा सूर नेहमी लावला जातो. मात्र, या सर्व सुरांना वाकुल्या दाखवत दोन महिन्यांच्या उन्हाळा सुट्टीतही बालवाचक, शालेय विद्यार्थ्यांनी काही काळ मोबाइलपासून दूर रहात पुस्तके वाचण्याचा आनंद घेतल्याचे समोर आले. त्यामुळे इंटरनेटच्या युगात वाचन संस्कृतीला बहर मिळत असल्याचे हे चित्र सुखावणारे आहे.
शालेय अभ्यासक्रमापलीकडे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तक वाचन स्पर्धा, पुस्तक पेटी योजना काही वाचनालयामध्ये राबविली जाते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पुस्तके वाचण्यासाठी महामुंबईतील सार्वजनिक ग्रंथालयात गर्दी होत आहे. त्यांचा मराठी पुस्तकांकडे ओढा कायम असल्याचे दिसून आले आहे, ज्यातून मराठी पुस्तकांचा आलेख चढता ठेवण्यात हातभार लागत आहे. यातूनच ‘मला काय हवं आहे’ या प्रश्नापासून सुरू होणारा वाचन प्रवास ‘जगात काय चाललं आहे’ हे जाणून घेण्यापर्यंत विस्तारतो आहे.
आजची पिढी स्मार्टफोनच्या जमान्यात मोठी होत असली, तरी तिचा अजूनही पुस्तकांशी असलेला संबंध सुटलेला नाही.
तंत्रज्ञानाच्या साह्याने बहुमाध्यमांचा वापर करून एखादा विषय अधिक सोपा करून सांगता येतो हे खरं; परंतु त्यामुळे हे तंत्रज्ञान पुस्तकांची जागा घेऊ शकत नाही, हेही तितकेच खरे असल्याचे चित्र वाचनालयातील पुस्तकांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून स्पष्ट होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कादंबरी, धार्मिक, आरोग्य, स्पर्धा परीक्षेची पुस्तके यावरील साहित्य आवडते. शालेय विद्यार्थ्यांचा चरित्रात्मक ग्रंथांकडे कल आहे.
मुंबई शहर, उपनगर 58
ठाणे 100
रायगड 62
पालघर 35
यावर्षी वाचनालयात बालविभागात चांगला प्रतिसाद मिळाला. नवीन 25 सभासद झाले. लहान मुलांसाठी पंचतंत्र, अकबर-बिरबलाच्या गोष्टीची पुस्तकं यांची जास्त मागणी होती. तर शालेय विद्यार्थ्यांनी छावा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची चरित्रे आणि इतर ऐतिहासिक पुस्तकांची मागणी केली.
संदीप पेडणेकर, ग्रंथपाल, माहीम सार्वजनिक वाचनालय
ग्रंथालयातील सभासदांच्या पाल्यांसाठी आम्ही मोफत पुस्तक वाचन योजना सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या बाल विभागात 145 सदस्य आहेत. चिंटू, फास्टर फेणे, महाभारत, रामायणाचे पुस्तके, इसाबनीती, छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके, पौराणिक कथांची पुस्तके सुट्टीच्या काळात मुलांनी वाचली.
करुणा कल्याणकर, सहाय्यक ग्रंथपाल, सार्वजनिक वाचनालय, कल्याण
आमच्या वाचनालयातील बालविभागात 400 हुन अधिक सभासद आहेत. सुट्टीमध्ये 20 सभासद आणखी वाढले. मोबाइलच्या जमान्यात हे चित्र नक्कीच सकारात्मक आहे. जनरल नॉलेजची पुस्तके, जेरिनिमस फिल्टन, विज्ञानाचे छोटे छोटे खंड आहेत. त्याला मागणी होती. सुनीता विल्यम्स परत आल्यानंतर त्यांच्या चरित्र पुस्तकाबाबत अनेक मुलांनी विचारणा केली.
मंजिरी वैद्य, ग्रंथपाल, श्री. वा. फाटक वाचनालय, विलेपार्ले