RBI Bank Cyber Security: एआय हल्ल्यांसाठी बँकांची तयारी काय? RBI ने बँकांकडून मागितला अहवाल

सायबर हल्ले वाढत असल्याने दक्षता घेण्याचे निर्देश
RBI
RBIPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकांना वाढत्या सायबर हल्ल्यांबाबत सावध केले आहे. सायबर सुरक्षेबाबत असलेल्या विद्यमान नियमांचे पालन केल्याचा पुरावा बँकांकडून मागितला असून, कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित जोखमींचा सामना करण्यासाठी काय तयारी आहे, याचा तपशील सादर करण्यास आरबीआयने सांगितले आहे. या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

जगभरातील बँकांना हॅकर्सकडून प्रगत एआय साधनांचा वापर करून लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा डेटा आणि बँकांमधील ठेवी धोक्यात आल्या आहेत. रॉयटर्सच्या या महिन्याच्या सुरुवातीच्या वृत्तानुसार, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांतील नियामक संस्था एआयमुळे निर्माण होणाऱ्या जोखमींवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

RBI
Maharashtra Political : राज्याच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा दावा

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काही बैठकांमध्ये आरबीआयने बँकांना ‘ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस’ (एपीआय) मधील त्रुटींची तपासणी करण्यास सांगितले आहे. एपीआय हे असे सॉफ्टवेअर लिंक्स आहेत, ज्यांचा वापर करून बँका बिगर-बँकिंग कर्जदाते आणि फिनटेक कंपन्यांशी जोडल्या जातात.

बँकांवरील हल्ले वाढले

भारतात अलीकडच्या काही आठवड्यांत सायबर घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (एसबीआय) मध्ये ३,९०० ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची घटना समोर आली आहे.

RBI
11th Admission: राज्यात अकरावीच्या बेकायदा ऑफलाइन प्रवेशांवर कारवाईचा बडगा; प्रत्येक विद्यार्थ्यामागे ५ हजारांचा दंड

बँकेने गेल्या आठवड्यात सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु नेमकी त्रुटी काय होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसऱ्या एका घटनेत, ८ ते ९ ऑक्टोबर रोजी मुंबईस्थित दोन बिगर-बँकिंग कर्जदात्यांच्या खात्यातून सुमारे सुमारे १६.६ कोटी रुपये परस्पर काढून घेण्यात आले. रॉयटर्सने पाहिलेल्या पोलिस तक्रारीनुसार, आयसीआयसीआय बँकेत असलेल्या खात्यांतून ७०० हून अधिक अनधिकृत ‘इन्स्टंट ट्रान्सफर’ (त्वरित हस्तांतरण) करण्यात आले.

हॅकर्सकडून आधुनिक प्रणालीचा वापर

भारताच्या ‘सीईआरटी-इन’ या सायबर सुरक्षा संस्थेने ९ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या एका सल्लागार सूचनेत इशारा दिला आहे की, हॅकर्स बँकांच्या ‘एपीआय क्रेडेंशियल्स’ची चोरी करत आहेत.

याद्वारे ते बँकांच्या स्वतःच्या प्रणालीतून पैसे बाहेर काढत असून, यासाठी कदाचित ‘एआय’ आधारित साधनांचा वापर केला जात असावा. या सप्ताहाच्या सुरुवातीला, ५५ हून अधिक वित्तीय संस्थांमधील ३०० अधिकाऱ्यांसाठी सायबर सुरक्षाविषयक प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती या संस्थेने एक्स या समाजमाध्यमावर दिली आहे.

लहान बँका रडारवर

नियामक धोरणांची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हॅकर्स लहान कर्जदाते, बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) आणि त्यांच्या तृतीय-पक्ष विक्रेत्यांना ‘सहज लक्ष्य’ मानतात.

बँकांसोबत काम करणाऱ्या एका सल्लागाराने सांगितले की, आरबीआयने सायबर सुरक्षा जोखीम व्यवस्थापनाबाबत बँकांना आधीच निर्देश दिले असले, तरी त्यांची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळेच, नियामक संस्थेने बँकांना या नियमांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.