

Maharashtra BJP State President
मुंबई : भाजपला लवरकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या रविंद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्ष आहेत. आता प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी ३० जूनला अर्ज भरतील. त्यानंतर सर्वानुमते १ जुलैला त्यांची नियुक्ती जाहीर केली जाणार आहे. वरळी डोम येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १ जुलैला सकाळी ११ वाजता त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री झाल्याने हे पद रिक्त आहे. यामुळे आता राज्य संघटनात्मक निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्याकडे राज्याच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
दरम्यान, भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जवळपास एक वर्षापासून रखडली आहे. ती प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. येत्या २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाापूर्वी नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती पक्षातील एका वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह १२ राज्यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडीची घोषणा होणार आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीपुर्वी अनेक राज्यांच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.