

मुंबई : हिंदी सक्तीविरोधात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करा आणि हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करा, असे आदेश शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. 5 जुलै रोजी मुंबईत निघणार्या मोर्चात राज ठाकरे यांच्यासोबत सहभागी होतानाच या हिंदी सक्ती दहन आंदोलनाची हाक त्यांनी दिली.
रविवारी 29 जून रोजी दुपारी 3 वाजता हिंदी सक्तीविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करत शालेय शिक्षण विभागाच्या हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करा, असे आदेश यावेळी उद्धव ठाकरेंनी दिले. त्याचबरोबर हिंदी सक्तीविरोधात जनजागरण आणि प्रबोधन करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
हिंदीच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंच्या वतीने 5 जुलै रोजी काढण्यात येणार्या मोर्चाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे. आपण कोणत्याही स्थितीत हा मोर्चा निघू देणार नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. राज व उद्धव ठाकरे खोटे नरेटिव्ह पसरवत आहेत. त्याला आमचा विरोध आहे.
न्यायालयाच्या निर्देशांनुसार त्यांना मोर्चा काढता येणार नाही. त्यांचा मोर्चा बेकायदेशीर आहे, असे सदावर्ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेचा मनसे नेते अविनाश जाधव यांनी समाचार घेतला. गुणरत्न सदावर्ते हा भाजपने पाळलेला माणूस आहे. सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरोधात काम करतात, ते पाहता मराठी माणूस एक दिवस त्याला घराबाहेर पडू देणार नाहीत. त्यांना मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल.