

मुंबई: सलग तीन वर्षे राणीबागेतील पर्यटकांची संख्या घटत आहे. 2022-23 मध्ये 30 लाख पर्यटकांनी भेट दिली होती. आता ही संख्या 25 लाखांपर्यंत खाली आली आहे, ही प्रशासनासमोरील चिंतेची बाब बनली आहे. राणीबागेत नवीन काय? असा सवाल पर्यटक करीत आहेत. जुनी स्थळे पाहून पर्यटक कंटाळले आहेत.
एकेकाळी कुटुंबे आणि मुलांचे आवडते असलेले हे प्राणिसंग्रहालय हळूहळू आपली लोकप्रियता गमावत आहे. 2022-23 मध्ये अंदाजे 29.56 लाख पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. यामधून अंदाजे 11.59 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
त्यानंतर 2023-24 मध्ये पर्यटकांची संख्या 28.97 लाखांपर्यंत घसरली आणि महसूलही किंचित घटून 11.46 कोटी रुपये झाला. 2025-26 मध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली, पर्यटकांची संख्या 25.42 लाखांपर्यंत कमी झाली आणि महसूलही अंदाजे 9.85 कोटी रुपयांपर्यंत घटला आहे.
शहरातील नवीन मनोरंजन साधनांचा उदय, डिजिटल माध्यमांकडे झालेला कल, उष्ण हवामान आणि प्रचंड गर्दी ही या घसरणीमागील काही कारणे सांगितली जात आहेत. पर्यटकांच्या म्हणण्यानुसार, जर नवीन सुविधा, आधुनिक आकर्षणे आणि अधिक उपक्रम सुरू केल तर गर्दी वाढू शकते.
राणीबागेमध्ये आशियाई सिंह आणण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. महापौर रितू तावडे यांनी या संदर्भात गुजरात सरकारला पत्रही लिहिले आहे. बीएमसी सुरुवातीला इस्रायलमधून झेब्रा आयात करण्याची योजना आखत होती, ज्यामध्ये गुजरात वन विभागाला झेब्य्रांची एक जोडी देऊन त्या बदल्यात आशियाई सिंह घेण्याचा प्रस्ताव होता. आता रॉयल बेंगॉल टायगर्स आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही चर्चा कागदावरच असून हालचाली मात्र सुरू झालेल्या नाहीत.