

कुर्ला: गोवंडीतील माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी 24 वर्षांपूर्वी पालिका निवडणूक लढवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर केले होते. याबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर चेंबूर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. 2002 च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 192 मधून रमेश कांबळे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी निवडणूक अर्जासोबत अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र जोडले होते.
या निवडणुकीत त्यांच्यासमोर रिपाइंचे राजेंद्र वाघमारे रिंगणात होते. मात्र कांबळे यांचा विजय झाला होता. त्यामुळे पराभूत उमेदवार वाघमारे यांनी कांबळे यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी नवी मुंबईच्या कोकण भवन येथे अर्ज दाखल केला होता.
कोकण भवन यांनी कांबळे यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे कांबळे लघुवाद न्यायालयात गेले. त्यांनीही कोकण भवन यांनी दिलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द केले होते.
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मते मिळालेल्या राजेंद्र वाघमारे यांना काही महिन्यांसाठी नगरसेवक बनवण्यात आले होते. त्यानंतर देखील रमेश कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानेदेखील कोकण भवन यांचा निकाल अंतिम ठेवल्याने चेंबूर पोलिसांनी याबाबत गुरुवारी कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.