

मुंबई : शेखर भोसले
रमाबाई आंबेडकर नगर हे भांडुप पश्चिमेतील डोंगर उतारावर वसलेले दरडप्रवण क्षेत्र आहे. हे क्षेत्र बौद्ध विहार व शासकीय खुल्या भूखंडाच्या जवळ आहे. या भागात अनेक कच्च्या-बांधकामाच्या झोपड्या, अरुंद गल्ल्या आणि अत्यंत घनदाट लोकवस्ती आहे. पावसाळ्यात येथील रहिवाशांच्या घरावर दरडी कोसळण्याचा धोका सतत भेडसावत असतो. दरडी कोसळण्याची शक्यता अधिक असल्याने येथील रहिवाश्यांना मुसळधार पावसाळ्यात प्रत्येकक्षणी सावध राहावे लागते.
मुंबईच्या 74 ठिकाणच्या वस्त्यांवर दरडींची तलवार लटकत आहे. हजारो मुंबईकर एक तर दरडीवर नाही तर दरडीखाली राहतात. कधी काय होईल याचा नेम नाही. असेच रमाबाई आंबेडकर नगर हे भांडुप पश्चिमेतील डोंगर उतारावर वसलेले दरडप्रवण क्षेत्र आहे. या भागात अनेक कच्च्या-बांधकामाच्या झोपड्या, अरुंद गल्ल्या आणि अत्यंत घनदाट लोकवस्ती आहे. पावसाळ्यात येथील रहिवाशांच्या घरांवर दरडी कोसळण्याचा धोका सतत भेडसावत असतो.
परंतु कोणतीही स्थायी व्यवस्था प्रशासनाकडून केली जात नसल्यामुळे येथील रहिवासी प्रशासनाच्या धोक्याच्या इशार्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या सध्याच्या राहत्या ठिकाणीच राहणे पसंत करत आहेत, असे येथील रहिवासी अशोक गायकवाड म्हणाले.
मोकळा मातीचा उतार, कच्च्या-बांधकामाच्या झोपड्या आणि बेकायदेशीर बांधकामे असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर येथील माती आणि दगडांची रचना अस्थिर आहे. येथील गाळ आणि भुसभुशीत मातीमुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता मुसळधार पावसात बदलते, ज्यामुळे दरडी कोसळण्याची शक्यता वाढते. पाण्याच्या निचर्याची योग्य व्यवस्था येथे नसल्यामुळे मातीची धारणक्षमता कमी होते, परिणामी दरडी कोसळण्याची शक्यता अधिक आहे.
पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिका आणि एस वॉर्ड प्रशासनाने येथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेने येथील लोकांच्या जागृतीसाठी माहितीपूर्ण बॅनर आणि फ्लेक्स लावले आहेत. प्रशासनाकडून येथील रहिवाशांसाठी महापालिका शाळेत तात्पुरत्या निवार्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. महापालिका आणि एनडीआरएफ यांनी येथील धोकादायक अवस्थेतील घरमालकांना, त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामार्फत येथील रहिवाशांना भूस्खलनावेळी काय करावे याबद्दल जनजागृती प्रशिक्षण दिले जात आहे. जर रहिवाशांनी धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि स्थलांतर केले नाही, तर कोणत्याही अपघाताची किंवा जीवितहानीची जबाबदारी प्रशासनाची राहणार नाही, असे एस प्रभागाच्या संबंधित महापालिका अधिकार्याने सांगितले.
दरड कोसळण्याचा धोका : पावसाळ्यात डोंगर उतारावरून दरडी कोसळण्याचा मोठा धोका आहे. आधीही या परिसरात दरड कोसळून मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
कमकुवत घरबांधणी : अनेक झोपड्या अस्थायी व कमकुवत साहित्याने बांधलेल्या आहेत. त्यामुळे त्या दरडीच्या धक्क्याला तोंड देऊ शकत नाहीत.
पाण्याच्या निचर्याची समस्या : पावसाचे पाणी नीट वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने गाळ, चिखल साचतो व दरड सरकण्याची शक्यता वाढते.
वाहतूक आणि मदत पोहोचण्याची अडचण : अरुंद रस्त्यांमुळे आपत्कालीन सेवा वेळेवर पोहोचू शकत नाही.
स्थानिक प्रशासनाची मर्यादित हालचाल : तात्पुरती उपाययोजना होते.पण दीर्घकालीन पुनर्वसन व स्थलांतर योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत.
भूस्खलन रोखण्यासाठी संरक्षक भिंती बांधून या संरक्षक भिंतींची नियमित देखभाल करण्याची आवश्यकता आहे.
मल्लिनाथ कुमार, स्थानिक रहिवासी
रमाबाई आंबेडकर नगरसारख्या दरडप्रवण क्षेत्रामध्ये तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना अत्यावश्यक आहेत. सरकार, महानगरपालिका आणि स्थानिक नागरिक यांनी समन्वयाने कार्य केल्यास जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.
सारंग राव, स्थानिक रहिवासी
तत्काळ स्थलांतर व पुनर्वसन : या धोकादायक भागातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांचे योग्य पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. डठअ (डर्श्रीा ठशहरलळश्रळींरींळेप र्रीींहेीळीूं) अंतर्गत गृहनिर्माण योजना राबवण्याची जरुरी आहे.
सिमेंट रिटेनिंग वॉल / दरड रोखण्यासाठी भिंती : डोंगर उतारावर मजबूत रिटेनिंग वॉल बांधणे आवश्यक आहे, जेणेकरून दरड कोसळणे टाळता येईल.
जलनिकासी सुधारणा : नाल्यांचे सुसूत्रीकरण व सिमेंटेड गटारांची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. साचलेले पाणी लवकर निघून जावे यासाठी झोपड्यांच्या भोवती चांगली ड्रेनेज यंत्रणा उभारण्याची जरुरी आहे.
सतर्कता यंत्रणांचे बळकटीकरण : महापालिका, एनडीआरएफ व नागरिकांना दरड सरकण्याच्या धोक्याची पूर्वसूचना देणारे यंत्र बसवणे आवश्यक आहे.
स्थानिक जनजागृती : नागरिकांना दरड कोसळण्याचा धोका, सुरक्षित वर्तन व आपत्कालीन कृती याविषयी प्रशिक्षण देणे.
स्थानिक समिती स्थापन करणे : रहिवाशांची मदत घेऊन स्वयंसेवी दल तयार करून आपत्कालीन मदत व सूचना कार्यक्षमपणे पाळणे गरजेचे.