Vijay Melava : मंचावर कोण असणार, पहिले भाषण राज की उद्धव ठाकरेंचं; वाचा मेळाव्याची रुपरेषा

आज सकाळी ११ वाजता या ऐतिहासिक मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्याची उत्सुकता केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर सामान्य नागरिकांमध्येही शिगेला पोहोचली आहे. कशी असेल मेळाव्याची रूपरेषा?
Vijay Melava
Vijay Melava pudhari photo
Published on
Updated on

Vijay Melava

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षांपासून मराठी माणून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आज आला आहे. एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि ठाकरे घराण्याचे दोन वारसदार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. वरळीतील डोम NSCI येथे होणाऱ्या या 'विजयी मेळाव्या'कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, दोन्ही ठाकरेंच्या तोफा येथून धडाडणार आहेत.

आज सकाळी ११ वाजता या ऐतिहासिक मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्याची उत्सुकता केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर सामान्य नागरिकांमध्येही शिगेला पोहोचली आहे. याचेच प्रतिबिंब मुंबईच्या रस्त्यांवर लागलेल्या निमंत्रण पत्रिकेच्या पोस्टरमधून दिसत आहे. विशेष म्हणजे, या पोस्टर्सवर मनसे किंवा शिवसेनेचा झेंडा नाही, केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो आणि त्याखाली 'कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा' ही एकच टॅगलाईन वापरण्यात आली आहे. यातून दोन्ही पक्ष मतभेद विसरून केवळ 'मराठी' या एका मुद्द्यावर एकत्र येत असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

Vijay Melava
Uddhav Raj Marathi Victory Rally : ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले

कशी असेल मेळाव्याची रूपरेषा?

या विजयी मेळाव्याची रूपरेषा अत्यंत काळजीपूर्वक आखण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यासपीठावर केवळ निमंत्रित पक्षांचे अध्यक्षच उपस्थित असतील. सर्वात मोठा प्रश्न होता की पहिले भाषण कोण करणार? तर, या मेळाव्यात पहिले भाषण मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील, तर सर्वात शेवटचे भाषण उद्धव ठाकरे करतील.

महाविकास आघाडीतील नेतेही लावणार हजेरी

या सोहळ्याला महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. तर, सीपीआय पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी हे देखील या विजयी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

मुंबईत जय्यत तयारी

कार्यक्रमासाठी वरळी डोममध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आसनव्यवस्था : डोमच्या आतमध्ये सुमारे ७ ते ८ हजार लोकांची बसण्याची सोय करण्यात आली आहे.

LED स्क्रीन्स : मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, डोमच्या आत आणि बाहेर रस्त्यावरही मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. जेणेकरून जागा कमी पडल्यास बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनाही कार्यक्रम थेट पाहता येईल.

पार्किंगची सोय : वाहनांच्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये ८०० गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे. याशिवाय महालक्ष्मी रेस कोर्सवर देखील चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असेल. दुचाकीस्वारांसाठी वरळी डोमच्या समोर कोस्टल रोडच्या पुलाखाली पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

वाजत गाजत या : वसंत मोरे यांचे आवाहन

"वाजत गाजत या" असे आवाहन मनसेतून ठाकरे गटात आलेले वसंत मोरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. मुंबईच्या मेळाव्याला रवाना होताना राज्यभरातील कार्यकर्त्यांना वसंत मोरे यांनी भावनिक साद घातली. मराठी माणसांच्या मनातील आजचा आनंदाचा दिवस वीस वर्षांच्या कालावधीनंतर येत आहे. दोन्ही बंधू एकत्रित येत आहेत ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. मी दोन्ही पक्षात काम केलं, पण या दोन्ही नेत्यांना एकाच मंचावर मी कधीच पाहिलं नाही माझ्यासाठी हा क्षण वेगळा असेल, असे मोरे यांनी म्हटले आहे.

पुण्यातून मनसैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकत्रित मुंबईकडे रवाना

पुण्यातून मनसैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकत्रित मुंबईकडे रवाना झाले आहेत. आजचा मेळावा नव्या युतीची नांदी म्हणत पुण्यातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित मुंबईकडे रवाना झाले. मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईकडे एकत्रित प्रवास केला. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम समोरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. आमच्यासाठी आजचा आनंदाचा दिवस. भविष्यात मोठे काहीतरी आम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसाचा आनंद वेगळा आहे, अशा भावना व्यक्त करत पुण्यातील सर्व स्थानिक नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news