

Raj Uddhav Thackeray Meeting:
शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (दि. २७ नोव्हेंबर) अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहचले. राज ठाकरेचे निवसास्थान शिवतीर्थवर या दोन नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याचं समजतंय.
यापूर्वीही या हे दोन बंधू अनेकवेळा एकमेकांच्या घरी भेटले आहेत. त्यावेळी देखील आता एकत्र निवडणूक लढवण्याबाबत घोषणा होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र कौटुंबिक भेट म्हणून या भेटीचा तपशील माध्यमांच्या हाती काही लागू दिला गेला नाही.
आजच्या बैठकीबाबत देखील अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. या भेटीमागची इनसाईड स्टोरी काय याची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीच जवळपास एक तास चर्चा केली. या बैठकीवेळी मराठी मतदार हा केंद्रबिंदू राहिल्याचं सूत्रांकडून कळतंय. मराठी मतदारांना एकत्र आणण्यासाठी जे शक्य आहे त्यावर भूमिका मांडण्याबाबत दोघांमध्ये सहमती झाल्याचं समजतंय.
त्याचबरोबर मुंबई महापालिकेवर प्रशासक आल्यापासून मुंबईची झालेली दशा आणि मराठी भाषेचा वाद याबाबत सत्य परिस्थिती लोकांपर्यंत कशी मांडण्यात यावी याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतील जागा वाटपाबाबत या दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली की नाही याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र याबाबत काँग्रेसची भूमिका थोडी नकारात्मक आहे. मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार देखील सकारात्मक आहेत. आजच्या राज उद्धव भेटीतदरम्यान या विषयी देखील चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.