

परतूर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी परतूर तालुक्यातील पाटोदा येथे आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. "या दगाबाज सरकारची लक्तरं वेशीवर टांगण्यासाठी माझा आजचा दौरा आहे," असे म्हणत त्यांनी भाजप म्हणजे 'चोर बाजार' झाला असल्याची घणाघाती टीका केली.
घोटाळ्यातून जन्मलेले सरकार : मत चोरी, जमीन चोरी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर थेट निवडणुकीतील गैरव्यवहाराचा आरोप केला. ते म्हणाले, "गेल्या विधानसभेत जनतेचा कौल मानला गेला नाही. जिथे जातोय तिथे लोक सांगतात की आम्ही तुम्हाला मत दिले होते, पण हे सरकार येऊच शकत नाही. याचा अर्थ कुठेतरी फार मोठा घोटाळा झालेला आहे. ज्या सरकारचा जन्मच घोटाळ्यातून झाला आहे, ते काय करणार असा सवाल उपस्थित केला.
अगोदर पक्ष चोरला. आता मत चोरी, त्याच्यानंतर गेले दोन-तीन दिवस आणखीन एक गाजते ती जमीन चोरी. म्हणजे काय, चोरांचा सगळा, तो भाजप पक्ष म्हणजे चोर बाजार झालेला आहे." असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरले. कर्जमाफी आणि जूनचा मुहूर्त "मी मुख्यमंत्री असताना तुम्ही न मागता कर्जमुक्ती केली होती. पण आता शेतकऱ्यांना संकटात असताना मुख्यमंत्र्यांनी जूनचा मुहूर्त दिला आहे. जूनमध्ये जर कर्जमुक्ती करणार असाल, तर आत्ताचे थकलेले कर्जाचे हप्ते आम्ही भरायचे की नाही? नवीन रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही?" असे थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी "सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. पण आता जानेवारीपासून सुमारे १,००० च्या आसपास शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. "या आत्महत्येचं पाप कोणाच्या डोक्यावर टाकायचं?" असा सवाल त्यांनी केला..
पीक विमा आणि नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १ रुपया, ८ रुपये, १४ रुपये इतकी तुटपुंजी मदत मिळाल्याच्या पुराव्यांचा उल्लेख करत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "एवढी थट्टा शेतकऱ्यांची मला नाही वाटत इंग्रजांच्या काळातसुद्धा कोणी कधी केली असेल," असे ते म्हणाले.
मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. खतांवर १८% जीएसटी लावून सरकार आधी शेतकऱ्यांकडून १२ हजार रुपये खिशात टाकते आणि मग प्रधानमंत्री सन्मान योजनेतून ६ हजार रुपये परत देते, हे शेतकऱ्याला कळत नाही. "शेतकऱ्यांच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी माफ का नाही करत?" असा प्रश्न त्यांनी केंद्राला विचारला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केवळ रडत न बसता लढण्याचे आवाहन केले आणि यापुढे जोपर्यंत तुम्ही सरकारच्या अंगावर जात नाही, तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही." विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तुटपुंजी मदत मिळाली याचे पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढा. ते म्हणाले, "आम्ही तुमच्याकडे भीक मागायला आलेलो नाही, आम्ही आमचा न्याय, हक्क मागायला आलेलो आहोत. असे ठाणकावून सांगा.
शेतकऱ्यांनी गावागावात फलक लावून "व्होट बंदी" करावी. "जोपर्यंत कर्जमाफी नाही, ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, तोपर्यंत भाजप महायुतीला मत नाही," असा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुढच्या महिन्यात परत आल्यावर मला "दगाबाज सरकारचा पंचनामा" हातामध्ये पाहिजे, असा निर्धार त्यांनी शेतकऱ्यांकडून करून घेतला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे,खासदार संजय जाधव शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख महेश नळगे, माधवराव कदम, पी एन यादव, प्रदीप बोराडे भारत पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती.