

पुढारी ऑनलाईन डेस्क: Raj thackeray-Devendra fadnavis| मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी व्यवहार होत आहेत की नाहीत हे पाहण्याचे आदेश दिले होते. या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दमदाटी केली, त्यामुळे वाद निर्माण झाला. परंतु, आता राज यांनी कार्यकर्त्यांना थांबण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.४) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री यांनी आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी "ही सरकारची जबाबदारी नाही का?" असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन".
राज ठाकरे पुढे म्हणाले, "मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहे की नाही ते पाहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँक प्रशासनाला करून द्या. दुसऱ्याच दिवसापासून तुम्ही सर्वदूर गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं. यातून आता मराठी भाषा आणि माणसाला कोणी गृहित धरू शकत नाही हा संदेश गेला. पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
आता सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्या नियमांची अंमलबजावणी करून घेणं आता सरकारची जबाबदारी आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की, असा इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.