

Raj Thackeray seatbelt warning MNS activists
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत. त्याचबरोबर त्यांना एखादी गोष्ट न पटल्यास ते समोरच्याला आपल्या खास शैलीत सुनावतात. मग तो पत्रकार, कार्यकर्ता असो की, नेता! ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. याचा अनुभव अनेक वेळा कार्यकर्त्यांना आलेला आहे. आज (दि.३) मनसे कार्यकर्ते तुषार संकपाळ आणि गणेश भोसले यांनी नवी गाडी घेतल्यानंतर ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेऊन गेले. यावेळी या दोघांना राज ठाकरे यांच्या खास स्वभावाचा प्रत्यय आला.
मनसे कार्यकर्ते तुषार संकपाळ आणि गणेश भोसले यांच्या नव्या गाडीचे पूजन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी ड्रायव्हींग सीटवर बसून राईड मारली. यावेळी त्यांनी सीटबेल्ट लावल्या शिवाय गाडी चालवायची नाही, अशी तंबी दोघांना दिली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्याशी विविध विषयावर संवाद साधला.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ताफा पुढे जात असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवून त्यांना वाट मोकळी करून दिली होती. या अनपेक्षित घटनेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
उद्धव ठाकरे यांचा वाहनांचा ताफा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’ समोरून जात होता. त्याच वेळी, राज ठाकरे यांचा ताफादेखील ‘शिवतीर्थ’मधून बाहेर पडत होता. दोन्ही नेत्यांचे ताफे एकाच वेळी आमनेसामने आले.
यावेळी राज ठाकरे यांनी तात्काळ आपल्या चालकाला आणि सुरक्षा रक्षकांना ताफा थांबवण्याची सूचना केली. उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण ताफा पुढे निघून जाईपर्यंत राज ठाकरे यांचा ताफा जागेवरच थांबून होता. उद्धव ठाकरे यांचा ताफा निघून गेल्यानंतरच राज ठाकरे आपल्या नियोजित प्रवासासाठी पुढे रवाना झाले.