मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
तिसरी भाषा सक्तीनिमित्ताने २० वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यांच्या येण्याचा मुंबईतल्या शिवसेनेशी जोडल्या गेलेल्या मराठी माणसाने जोरदार जल्लोष केला. आता या दोन्ही भावांनी निवडणुका एकत्र लढाव्यात, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. महाविकास आघाडीत समाविष्ट झाल्यानंतर नाराज झालेला मतदार परत येण्याची संधी बंधूभावनेने मिळत असल्याने मनसेला मुंबईत योग्य त्या जागा देऊ, अशी उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांची भूमिका आहे.
२०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेने जिंकलेल्या सर्व वॉडाँसह त्यांची शक्ती असलेल्या जागा मन मोठे करून त्यांना दिल्या तर त्याचा उबाठाला लाभ होईल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. भावनिक ऐक्य मुंबईचा गड राखण्यासाठी कामाला येईल, असे मातोश्रीत महत्त्वाचे स्थान असलेल्या एका नेत्याचे मत आहे, तर मविआत राज यांच्या मनसेला सामील करून घेण्याचा विश्वास ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी तसे संकेत दिले. दोन्ही भावांशी संपर्क साधण्याचे काम संजय राऊत यांनीच केले होते, हे विशेष.
राज ठाकरे यांनी मात्र एकत्र निवडणुका लढवण्यासंबंधी अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत. साहेबांची भूमिका कळल्यानंतरच महापालिका निवडणुकीत काय मागावे हे ठरवता येईल, असे सांगत किमान १०० वाँडाँत आम्हाला लढायची संधी मिळायला हवी, असे मनसेच्या एका महत्त्वाच्या नेत्याने पुढारीला सांगितले. हिंदुत्वाच्या मोठ्या अजेंड्याचा प्रसार करणाऱ्या भाजपवर भाषक आणि प्रादेशिक ऐक्याने मात करता येईल, असे कार्यकत्यांना वाटते. उबाठाला सत्ता राखण्यासाठी एकत्र यायचे आहे तर मनसेला दोन भाऊ २० वर्षांनी एकत्र आल्याने भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करण्यापेक्षा मातोश्री जवळची वाटते आहे.
वरळीतल्या मेळाव्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. छोटेमोठे कार्यकर्ते एकमेकांकडे अत्यंत प्रेमादराने पाहू लागले असून मनोमिलनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असे त्यांना वाटते. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली या एमएमआर क्षेत्राबरोबरच नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत राज आणि उद्धव हे दोघे एकत्र आले तर राजकीय चित्र बदलेल असे मानले जात आहे. मुंबईतल्या गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला २८ टक्के मते होती, तर भाजपला २७ टक्के. प्रचंड विस्तारलेल्या भाजपला या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची मते मिळतील? शिंदेंकडे गेलेले नगरसेवक काही मते नक्कीच फिरवतील. त्यामुळे त्यांच्या मतांची बेरीज होईल, मात्र शिवसेना जन्माला घालणाऱ्या उबाठाची मते कमी होतील. या परिस्थितीत ८ टक्के मते मिळवणारी मनसे समवेत घेणे उबाठाला फायदेशीर ठरणारे आहे. आज ठाकरेंच्यातला दुवा म्हणून काम करणारे खा. संजय राऊत यांनी आम्ही राज यांना महाविकास आघाडीचा भाग करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र राज ठाकरे यांनी सध्या याबाबत कोणताही विचार मांडलेला नाही असे समजते. ते कालच्या मेळाव्यातही एकत्र येण्याबद्दल काही बोलले नाहीत. उद्धव ठाकरे मात्र एकत्र आलो आहोत, आता एकत्र राहू, असे म्हणाले.