

Raj Thackeray CJP Student Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून सरकारने आंदोलकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील सविस्तर पोस्टमधून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याची पद्धत आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज पाहता सरकारचा दृष्टिकोन चिंताजनक वाटतो. आंदोलने दडपण्याऐवजी ती समजून घेऊन संवादातून मार्ग काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना ठाकरे म्हणाले की, पेपर लीकसारख्या गंभीर प्रकरणानंतरही सरकार त्यांना का पाठीशी घालत आहे, हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. जबाबदारी निश्चित करून उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही थेट आवाहन केले. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम घेणारे पंतप्रधान आता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशीही चर्चा करावी. विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
त्यांच्या मते, हे आंदोलन केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित नाही. रोजगार, शिक्षण व्यवस्था, महागाई, प्रशासनावरील अविश्वास आणि भविष्यातील असुरक्षितता अशा अनेक प्रश्नांचा हा एकत्रित उद्रेक आहे. त्यामुळे आंदोलनाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहण्याऐवजी व्यापक सामाजिक असंतोष म्हणून त्याचा विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, आंदोलने दडपण्यात कोणताही मोठेपणा नसतो. आंदोलन होऊ न देणे किंवा ते संवादाच्या माध्यमातून शांततेने सोडवणे, हीच सक्षम प्रशासनाची खरी ओळख असते. सरकारने कठोरतेपेक्षा समंजसपणा दाखवून विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकावा, असे आवाहन त्यांनी केले.
मनसेने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगत, परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणणे आणि जबाबदार मंत्र्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.