

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील ३ ते ४ तासांत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
मुंबई आणि ठाण्यात रात्रभर हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस सुरूच आहे. या ठिकाणी गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी 20 ते 40 मिमी पाऊस पडला आहे. आज सकाळपासून आकाश अंशतः ढगाळ आहे. दरम्यान पुढील काही तासांत पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्रात आजपासून मंगळवार ६ ऑगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान सातारा, कोकण आणि गोव्याला आज रेड अलर्ट देण्यात आला असून, अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र (२, ३ ऑगस्ट), पश्चिम मध्य प्रदेश (३, ४ ऑगस्ट), गुजरात, कोकण आणि गोवा (३ ऑगस्ट) रेड अलर्ट आहे. तसेच पूर्व राजस्थानला देखील ४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.