मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ) यापूर्वी चौकशी केली आहे. या दोन्ही नेत्यांविरोधात ईडीकडे पुरावे असल्याची माहिती देखील मध्यंतरीच्या काळात समोर आली होती. पंरतु, असे असतानाही त्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. ही बाब एकंदरीतच ईडीच्या तपास प्रक्रियेवर संशयाची सुई निर्माण करणारी आहे. गांधी कुटुंबियांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही? यासंदर्भात 'ईडी'ने स्पष्टोक्ती द्यावी, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. ईडीने भ्रष्टाचार करणार्या या नेत्यांना अटक केली नाही, तर त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जावू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. (Rahul Gandhi)
महाराष्ट्रातील अनेक नेते भ्रष्टाचाराप्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. यातील दोन मंत्री काही काळापासून तुरूंगात देखील आहेत. लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणातही अनेकांना ईडीने अटक केली आहे. परंतु, कोट्यवधींचा घोटाळा असून देखील गांधी कुटुंबियांना अटक करण्यात आली नाही. महाराष्ट्रात सत्तांतरापूर्वी वेगवेगळ्यापद्धतीने आमदारांना ईडीने आमदारांना वेठीस धरले होते. आमदारांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावरील चौकशीची ससेमिरेतून सुटका होते. भाजपने असा दुजाभाव करू नये.
सोनिया गांधी यांच्या चौकशीपूर्वीच ईडीकडून भष्ट्राचारासंबंधी पुरावे गोळा केले होते. शेल कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील महत्वाचे धागोदोरे ईडीच्या हाती लागले आहेत. (Rahul Gandhi)
सोनिया आणि राहुल गांधी यांनी २०१० मध्ये यंग इंडिया नावाने कंपनी सुरू करीत दोन हजार कोटींची संपत्ती हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत. या आरोपांमध्ये तथ्य असल्याने ईडीने पुन्हा तपास चक्रे फिरवली आहेत. शेल कंपनीच्या माध्यमातून गैरव्यवहार झाल्याचे प्रबळ पुरावे असतांना देखील या प्रकरणात अटक का करण्यात आलेली नाही? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. कॉंग्रेस नेत्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पाटील सांगितले.
हेही वाचा;