

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशात जाऊन भारताच्या लोकशाहीची बदनामी करत आहेत. वारंवार निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे ते विचलित झालेले असून त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. त्यांनी जनतेमधून जाऊन विश्वास संपादन केला पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२१) पत्रकारांशी बोलताना दिला. (Devendra Fadnavis on Rahul Gandhi)
ते पुढे म्हणाले की, भारताची, भारतीय लोकशाहीची, भारतीय संविधानाने तयार केलेल्या संस्थांची राहुल गांधी बदनामी करत आहेत. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे निंदनीय आहे. सतत झालेल्या निवडणुकीतील पराभवामुळे हा परिणाम असून राहुल गांधी विदेशात जाऊन आपल्या देशाबाबत खोटं बोलत आहेत. वारंवार निवडणुका हरल्याने त्यांच्या मनावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. खरा देशभक्त विदेशात जाऊन देशाची बदनामी करणार नाही. माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात बदनामी करून त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेची विश्वासार्हता मिळवली तरच त्यांची मते वाढतील. आणि निवडणुका जिंकाव्यात. परदेशात भारताची बदनामी करून ते निवडणुका जिंकू शकत नाहीत. उलट त्यांचीच उंची कमी होऊ शकते.
ते देशाचे विरोधी पक्षनेते असताना सातत्याने देशाची बदनामी करत आहेत. त्यामुळे संशय निर्माण होत आहे की, ते नेमका कुणाचा अजेंडा चालवत आहेत. हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली विधानसभा निवडणुका ते हारले आणि आता ते मतदान प्रक्रियेवर आणि मतदार यादीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. अतिशय बाळबोधपणाचा हा प्रकार आहे. त्यामुळे त्यांनी जनतेत जाऊन भारताची बदनामी करणे बंद करावे, असे आमचे त्यांना आवाहन आहे.