

नागपूर : महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी, २० एप्रिल रोजी ५० पिंक ई-रिक्षा वितरीत करण्यात येणार आहेत.
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने येथील नियोजन भवनात सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव,महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या महत्वाकांशी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात २००० पिंक ई-रिक्षा वितरित होणार आहेत. यासाठी २० ते ५० वर्षे वयोगटातील इच्छुक महिलांचे २०४० अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने १०३२ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ५० पात्र लाभार्थी महिलांना पिंक ई-रिक्षा वितरित करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक ई-रिक्षा ही महत्वाकांक्षी योजना राज्यातील आठ जिल्ह्यांकरीता राबविण्यात येणार आहे. यात नागपूर जिह्यामध्ये २००० महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे.
यामध्ये राज्यतील पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व ई-रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.