Property Sales : पुण्यात मालमत्ता विक्रीत 6 टक्के वाढ
मुंबई : मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही मालमत्ता खरेदी-विक्री क्षेत्र विस्तारत आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 14 हजार 234 मालमत्तांची विक्री झाली. नोव्हेंबर 2024च्या तुलनेत यावर्षी 6 टक्के वाढ दिसून आली.
यावर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 12 टक्के अधिक मालमत्तांची विक्री झाली. नोव्हेंबरमधील मुद्रांक शुल्क वसुली 565 कोटी रुपये आहे. यात मासिक 7 टक्के, तर वार्षिक 19 टक्के वाढ झाली. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात 1 लाख 73 हजार 578 मालमत्तांची विक्री झाली. ही गेल्या 4 वर्षांतील सर्वाधिक विक्री आहे. यातून 6 हजार 675 कोटी रुपये महसूल जमा झाला. नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालातून हे चित्र स्पष्ट झाले आहे.
घरांच्या आकारांची एकूण पसंती वर्षभर स्थिर राहिली आहे. 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांचा वाटा 25 टक्क्यांवरून 24 टक्क्यांपर्यंत घसरला, तर 500 ते 800 चौरस फूट श्रेणीतील घरांचा वाटा 46 टक्क्यांवर स्थिर राहिला. 800 चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या घरांचा वाटा 29 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे.
50 लाख ते 1 कोटींच्या घरांना मागणी
यावर्षी सर्वाधिक मागणी 50 लाख ते 1 कोटी किंमतीच्या घरांना आहे. या किमतींच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण नोव्हेंबर 2024 मध्ये 26 टक्के होते. त्यात यावर्षी 29 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. 25 लाखांखालील घरांचा वाटा गेल्या वर्षी 29 टक्के होता. त्यात यावर्षी 27 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. 25 लाख ते 50 लाख, 1 कोटी ते अडीच कोटी आणि अडीच कोटी ते 5 कोटी इतक्या किमतींच्या मालमत्तांची मागणी स्थिर राहिली आहे.
