पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर सोमवारी एका कारमधून पाच कोटी रुपयांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त केलेले ५ कोटी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचे असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. काय बापू, किती हे खोके? अशी पोस्ट राऊत यांनी सोशल मीडियावर केली. त्यांच्या आरोपानंतर शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Assembly Polls)
पाच कोटी रूपयांची रोकड असलेली कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील असल्याचे समजताच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांच्यावर तिरंदाजी करणारे ट्विट केले. एका आमदाराच्या गाडीत १५ कोटी सापडले. निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले आहेत. १५ कोटीचा हा पहिला हप्ता असल्याचा दावा राऊत यांनी केला. हे आमदार कोण? काय झाडी, काय डोंगर, काय बापू किती हे खोके? असे म्हणत राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. (Maharashtra Assembly Polls)
संजय राऊत यांच्या आरोपानंतर आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. "ती गाडी माझी किंवा माझ्या कुटुंबातील कुणाची नाही. नेमकं काय झालंय हे मला माहीत नाही. संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि आम्ही यशस्वी राजकीय उठाव केल्यापासून रात्री झोपताना झाडं दिसतयं तर सकाळी उठल्यावर डोंगर दिसतोय, मला बदनाम करण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. त्या गाडीशी माझा काही संबंध नाही," असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.