Shivendraraje Bhonsle: राजघराणे म्हणून नाही तर कामातूनच मते मिळतात- शिवेंद्रसिंहराजे भोसले

Pudhari News Maha Summit 2026: राजघराण्याचा वारसा जन्माने मिळतो; मात्र त्या वारशाला जनतेच्या विश्वासाची जोड देण्यासाठी प्रत्येक पिढीला आपापली परीक्षा द्यावी लागते
shivendraraje bhonsle
shivendraraje bhonslePudhari News
Published on
Updated on

Shivendraraje Bhonsle Interview Pudhari News Maha Summit 2026

पवन होन्याळकर

मुंबई : राजघराण्याचा वारसा जन्माने मिळतो; मात्र त्या वारशाला जनतेच्या विश्वासाची जोड देण्यासाठी प्रत्येक पिढीला आपापली परीक्षा द्यावी लागते. ‘राजे’ हे नाव अभिमानाचे असले, तरी त्याहून मोठी जबाबदारी त्यामागे आहे, असे स्पष्ट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय प्रवासाकडे पाहण्याची भूमिका स्पष्ट केली. घराण्याच्या नावामुळे लोकांचा विश्वास मिळू शकतो; मात्र केवळ त्या नावावर दीर्घकाळ राजकारण करता येत नाही. लोकांमध्ये राहणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांना वेळ देणे आणि केलेल्या कामातून विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगताना ‘हे माझे राज्य आहे’ अशी भूमिका कधीच नव्हती; उलट ते ‘रयतेचे राज्य’ होते, याची आठवण त्यांनी करून दिली. आजची लोकशाही ही त्या लोककल्याणाच्या विचारांशी जोडलेली असल्याचे सांगत लोकशाहीची मूल्ये केवळ राज्यकर्त्यांनी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने जपली पाहिजेत, ‘छत्रपतींचे नाव आमच्यापेक्षा इतरांनीच जास्त वापरले; आम्हाला तेवढे वापरायलाच मिळाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील रस्त्यांचा प्रश्न त्यांच्या राजकीय कामकाजाच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेषतः गेली अनेक वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या महामार्गाच्या रखडलेल्या कामामागे भूसंपादन, कायदेशीर अडचणी, चुकीच्या एजन्सी, नैसर्गिक परिस्थिती आणि अन्य कारणे असल्याचे सांगत आता ९५ टक्के काम अंतिम टप्प्यात आल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते बांधून काही दिवसांतच त्यावर खड्डे का पडतात, या सामान्य नागरिकांच्या प्रश्नालाही त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून उत्तर दिले.

बदलत्या हवामानामुळे कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीचे रस्ते आणि त्यांची ड्रेनेज व्यवस्था आता पुरेशी ठरत नाही. रस्ते बांधणीचे पॅरामीटर्स बदलून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामांबरोबरच कंत्राटदारांच्या थकीत देणीचाही प्रश्न त्यांनी स्पष्ट केला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या मोठ्या देणीपैकी गेल्या वर्षभरात मोठी रक्कम अदा केल्याचे सांगत उर्वरित देणी भागविण्यासाठीही तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कामे सुरू असल्याने देणी ही एक निरंतर प्रक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले.

shivendraraje bhonsle
Devendra Fadnavis On Pm Post: पीएम इन वेटिंग कधीच कन्फर्म झालेले नाही; फडणवीसांचा टोला

भाऊ उदयनराजे भोसले यांच्यासोबतच्या राजकीय संबंधांमध्ये झालेला बदल हा या मुलाखतीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला. पूर्वीच्या संघर्षामुळे घराण्याच्या प्रतिष्ठेला गालबोट लागत असल्याची जाणीव दोघांनाही झाली. राजकारणातील पदे येतात-जातात; मात्र घराण्याचा वारसा आणि प्रतिष्ठा मोठी आहे, या भावनेतून दोघांनी पुन्हा एकत्र काम करण्याचा निर्णय घेतल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

वडील अभयसिंहराजे भोसले यांचा राजकीय वारसा आणि त्यांच्या नेतृत्वामुळे सातारा जिल्ह्याच्या विकासाला मिळू शकणारी दिशा यावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे भावुक झाले. मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याची खंत वडिलांनी कधीही मनात ठेवली नाही; मात्र त्यांना संधी मिळाली असती, तर सातारा जिल्ह्याचा विकास आजच्या तुलनेत कितीतरी पुढे असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या चर्चेत पुणे, कोल्हापूर आणि सोलापूरचा उल्लेख होतो; मात्र साताऱ्याचा अपेक्षित दबदबा दिसत नाही, ही सातारकर म्हणून खंत असल्याचे त्यांनी सांगितले.

shivendraraje bhonsle
Chiplun Flyover: चिपळूणचा उड्डाणपूल गणेश चतुर्थीपूर्वी तर मुंबई- गोवा महामार्ग सहा महिन्यात पूर्ण होणार- शिवेंद्रराजे भोसले

‘पुढारी’शी जिव्हाळ्याचे नाते...

मुलाखतीच्या अखेरीस शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी असलेल्या जुन्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण सांगितली. निवडून आल्यानंतर सुरुवातीच्या काळात जाधव साहेब यांनी फोन करून, ‘राजे, तुम्ही पक्षाचे आमदार नाही, तुम्ही माझे आमदार आहात,’ असे सांगितले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. या आठवणीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, राजकारणात मंत्रिपद येईल आणि जाईल; पदेही बदलत राहतील. मात्र माणसांमधील नाती आणि आयुष्यातील काही आठवणी कायम राहतात. ‘पुढारी’चे आणि जाधव साहेबांचे आपल्यावर असलेले प्रेम आपण कधीही विसरू शकणार नाही, असे सांगत त्यांनी ‘पुढारी’चे मनापासून आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news