Pudhari Mahasummit 2026 | मते कामातूनच मिळतात ! राजघराणे म्हणून नाही !!

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ‘पुढारी न्यूज’च्या महासमिटमध्ये दिलखुलास मुलाखत
Pudhari Mahasummit 2026 |
मुंबई : ‘पुढारी न्यूज महासमिट २०२६’मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पुढारी न्‍यूजचा गोल्‍डन बूम देऊन पुढारी माध्‍यम समूहाचे मुख्‍य संपादक आणि चेअरमन इमेरिटस डॉ. प्रतापसिंह जाधव. M.S.B
Published on
Updated on

पवन होन्याळकर

मुंबई : राजघराण्याचा वारसा जन्माने मिळतो; मात्र त्या वारशाला जनतेच्या विश्वासाची जोड देण्यासाठी प्रत्येक पिढीला आपापली परीक्षा द्यावी लागते. ‘राजे’ हे नाव अभिमानाचे असले, तरी त्याहून मोठी जबाबदारी त्यामागे आहे, असे स्पष्ट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या राजकीय प्रवासाकडे पाहण्याची भूमिका स्पष्ट केली. हॉटेल ट्रायडेंटमध्‍ये पुढारी न्‍यूजच्‍या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्‍यात आलेल्‍या महाराष्‍ट्र जेन नेक्‍स्‍ट 'महासमिट २६' मध्‍ये ते बोलत होते. सहायक वृत्त संपादक नम्रता वागळे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय वारशापासून विकासाच्या प्रश्नांपर्यंत आणि साताऱ्याच्या राजकारणापासून कौटुंबिक नात्यांपर्यंत अनेक पैलूंवर सविस्तर आणि दिलखुलास भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगताना ‘हे माझे राज्य आहे’ अशी भूमिका कधीच नव्हती; उलट ते ‘रयतेचे राज्य’ होते, याची आठवण त्यांनी करून दिली. आजची लोकशाही ही त्या लोककल्याणाच्या विचारांशी जोडलेली असल्याचे सांगत लोकशाहीची मूल्ये केवळ राज्यकर्त्यांनी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने जपली पाहिजेत, ‘छत्रपतींचे नाव आमच्यापेक्षा इतरांनीच जास्त वापरले; आम्हाला तेवढे वापरायलाच मिळाले नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍याशी झालेली ही प्रश्‍नोत्तरे -

प्रश्न : आपल्या नावापुढे ‘राजे’ लावताना अभिमान असतो की त्यापेक्षा मोठी जबाबदारी?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : नक्कीच ही जबाबदारी आहे. ज्या घराण्याचा वारसा मला जन्माने मिळाला आहे, तो माझ्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. राजकारणात पदे येतात आणि जातात. आमदार, मंत्री अशी पदे कायमची नसतात; पण घराण्याचा वारसा कायम असतो. गेल्या अनेक वर्षांत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून आपण जे काही बोलतो, त्यापेक्षा या घराण्यातील व्यक्ती म्हणून आपण काही सांगितले, तर लोक त्यावर अधिक विश्वास ठेवतात.‘हे सांगत आहेत म्हणजे हे करतील’, ‘हे जे म्हणत आहेत ते खरे सांगत आहेत’, असा लोकांचा विश्वास असतो. त्यामुळे या घराण्यातील व्यक्ती म्हणून आपण काय बोलतो, कसे वागतो आणि आपली जबाबदारी कशी पार पाडतो, याची जाणीव कायम ठेवावी लागते.

प्रश्न : छत्रपतींची राजेशाही आणि आजची लोकशाही, हा संपूर्ण प्रवास तुम्ही कसा पाहता?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : इथे मी थोडी दुरुस्ती करेन. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही ‘हे माझे राज्य आहे’ असे म्हटले नाही. त्यांनी ‘हे रयतेचे राज्य आहे’, अशी भूमिका घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा छत्रपती संभाजी महाराज, या सगळ्याचे मालक आम्ही आहोत, ही आमची प्रॉपर्टी आहे किंवा आमची रियासत आहे, असा विचार त्यांनी कधी केला नाही. हे रयतेचे राज्य आहे, ही त्यांची भूमिका होती. आज आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. मला वाटते, ज्यांनी लोककल्याणाचा विचार पुढे नेला, त्यांच्या विचारांची मूल्ये आपण जपली पाहिजेत.

प्रश्न : सार्वजनिक बांधकाम खाते हे ‘थँकलेस’ खाते म्हणावे लागेल. केलेली कामे कुणाच्या लक्षात येत नाहीत; पण न केलेली कामे मात्र लगेच दिसतात. तुम्हाला काय वाटते?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : खरं सांगायचं तर राजकारण हेही थोडं ‘थँकलेस’ क्षेत्र आहे. दहा कामे केली, दहा कामे सांगितली, त्यापैकी आठ झाली आणि दोन राहिली, तर त्या आठ कामांवर पाणी सोडून त्या दोन कामांचीच चर्चा होते. हा अनुभव आहे, पण आज सोशल मीडियामुळे चांगल्या कामाची दखलही घेतली जाते. आठ-दहा दिवसांपूर्वी गोवा महामार्गावर निवळी, लांजा परिसरातील शेवटच्या टप्प्यातील तीन-चार पूल खुले केले. त्याचे फोटो टाकल्यानंतर अनेकांनी अतिशय सुंदर काम झाले, अशा प्रतिक्रिया दिल्या.

ज्यांना एखाद्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव येतो, ते चांगले काम झाले असेल तर ते मान्य करतात. मात्र काही ठिकाणी काम राहून गेले, अर्धवट राहिले किंवा काही त्रुटी राहिल्या, तर त्याची चर्चा जास्त होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते मी ‘थँकलेस’ खाते म्हणणार नाही.

प्रश्न : गोवा महामार्गाचा विषय निघाला आहे. यंदाच्या गणपतीला आम्हाला गावाकडे जायचे आहे. कोकणात जाणाऱ्यांना खड्डेमुक्त रस्ता मिळणार का?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : मागच्या गणपतीलाही मोठ्या संख्येने मुंबईकर आणि कोकणवासी गावाकडे गेले होते. ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

यंदाही आमचा प्रयत्न सुरू आहे. निवळी, लांजा परिसरातील काही महत्त्वाची कामे व चिपळूणचा पूलही गणपतीपूर्वी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मध्यंतरी तिथे काही दुर्घटना झाल्याने काम पुन्हा करावे लागले. त्यामुळे वेळ गेला. गणपतीपूर्वी हा पूल सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रश्न : देशभर हायवे चकचकीत होत आहेत, पण मुंबई-गोवा महामार्गाला २० वर्षे झाली तरी प्रश्न संपत नाही. कोलाडचा पूल, माणगाव बायपास, चिपळूणचा प्रश्न, सिंधुदुर्गातील खड्डे, चिखल, दरडी... हे कधी सुधारणार?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : गेल्या वर्षभरात या महामार्गावर अनेक दौरे केले, बैठका घेतल्या. त्यातून विलंबाची अनेक कारणे समोर आली. नैसर्गिक परिस्थिती हा एक भाग आहे. काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेपाचा विषय होता. काही ठिकाणी भूसंपादन आणि कायदेशीर अडचणी होत्या. या सगळ्यामुळे महामार्गाचे काम लांबत गेले. माणगाव बायपासची जुनी एजन्सी काम करत नव्हती. नवीन एजन्सी नेमून काम युद्धपातळीवर सुरू आहे. परशुराम घाट हा नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. दरडी कोसळण्याचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. त्यामुळे केवळ दरड हटविणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. परशुराम घाटाला बायपास करण्यासाठी नवीन व्हायाडक्टचा प्रस्ताव आम्ही पुढे आणला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे जवळपास ९५ टक्के काम पूर्णत्वाच्या दिशेने आले आहे. २० वर्षांपासून सुरू असलेले हे काम आता लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही त्यासाठी आग्रह आहे.

प्रश्न : रस्ता दुरुस्त होतो, पुन्हा खड्डे पडतात; पुन्हा दुरुस्ती होते आणि पुन्हा खड्डे पडतात. हे दुष्टचक्र का थांबत नाही?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : हवामानात मोठे बदल होत आहेत. महिनाभरात पडणारा पाऊस काही वेळा एका दिवसात पडतो. तीन-चार तासांत २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडतो. अशा परिस्थितीत आपल्या जुन्या रस्त्यांची ड्रेनेज व्यवस्था तेवढ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी नसते. त्यामुळे रस्ते टिकत नाहीत. आता ‘सॉईल स्टॅबिलायझेशन’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. आम्ही ज्या ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरले आहे, तिथे गेल्या दोन वर्षांच्या पावसात रस्ते चांगले टिकले आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे सुरुवातीला खर्च वाढेल. पण रस्ता टिकला तर पुन्हा पुन्हा खड्डे भरण्याचा खर्च वाचेल. कोकण, ठाणे, पालघर, गडचिरोली आणि ज्या भागांत पावसाचे प्रमाण जास्त आहे, तिथे रस्ते बांधणीचे पॅरामीटर्स बदलण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.

प्रश्न : निकृष्ट रस्त्यांसाठी कंत्राटदारांकडे बोट दाखवले जाते, पण कंत्राटदारांची हजारो कोटींची देणी सरकारकडे आहेत. आंदोलनांपासून आत्महत्येपर्यंतची वेळ येते. हे गणित कुठे चुकते?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : मंत्री म्हणून या खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली, त्यावेळी साधारण ४२ हजार कोटी रुपयांची देणी होती. गेल्या वर्षभरात त्यापैकी साधारण २२ ते २३ हजार कोटी रुपयांची देणी आम्ही अदा केली आहेत.

आता साधारण १७ हजार कोटी रुपये बाकी आहेत. त्यासाठीची तरतूदही केली आहे. बजेटमध्ये जवळपास १५ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. सर्व कामांच्या देयकामध्ये अडचण आहे, असे नाही. एडीबी, सीआरआयएफ, नाबार्ड, एआयबी अशा निधीतून होणाऱ्या कामांमध्ये पेमेंटची अडचण नाही. गेल्या वर्षभरात २२-२३ हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे सरकार पैसे देतच नाही, असे नाही.

प्रश्न : रस्ता चांगला मिळत नसेल तर टोल का भरायचा? आम्ही कर भरतो, त्याचा पैसा कुठे जातो? टोलचा हा झोल कधी संपणार?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : राज्याच्या पॉलिसीनुसार कमर्शियल वाहनांव्यतिरिक्त हलकी चारचाकी वाहने आणि दुचाकीसारख्या वाहनांना अनेक ठिकाणी टोलमधून सूट आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्राची स्वतंत्र टोल पॉलिसी आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील अनेक कामे बीओटी पद्धतीने झाली आहेत. त्या पद्धतीत कंत्राटदाराला बँकेकडून पैसा उभा करावा लागतो. त्याची परतफेड टोलमधून करण्याची व्यवस्था असते. त्यामुळे त्या मॉडेलमध्ये टोल हा आर्थिक रचनेचा भाग आहे, पण नागरिकांचा सवाल योग्य आहे. म्हणून रस्ता खराब झाल्यानंतर दुरुस्ती करण्यापेक्षा तो खराब होण्याच्या आधीच देखभाल केली पाहिजे. कंत्राटदारांवर अधिकाऱ्यांचा वचक असला पाहिजे. वेळेवर दुरुस्ती झाली, तर नागरिकांची नाराजीही कमी होईल.

प्रश्न : साताऱ्यातील भावा-भावाच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. तुम्ही आणि उदयनराजे आता एकत्र काम करता. हा बदल कसा झाला?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : आम्ही दोघेही भाजपमध्ये अनेक वर्षे काम करत आहोत. ते खासदार आहेत आणि मी आमदार आहे. स्थानिक पातळीवरही आम्ही एकत्र काम करत आहोत.

सातारची नगरपालिका आम्ही भाजपच्या माध्यमातून एकत्र लढवली आणि पुन्हा बहुमताने निवडून आलो. त्यामुळे आता आमच्यात संघर्षाचा विषय नाही. पूर्वी काही जुन्या कारणांमुळे संघर्ष झाला होता, पण त्यातून माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या आणि कुठेतरी घराण्याला गालबोट लागत होते. राजकारणातील पदे येतात आणि जातात. एखादे पद मिळेल किंवा मिळणार नाही, हा विषय वेगळा आहे, पण आपल्या संघर्षामुळे घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागता कामा नये, ही भावना दोघांमध्ये निर्माण झाली.त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न : तुमच्या पक्षातील एका सर्वेक्षणात ‘जेन झी’ लीडर म्हणून तुम्हाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे सांगितले जाते. तरुण पिढी तुमच्याकडे नेतृत्व म्हणून पाहते, याकडे तुम्ही कसे पाहता?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : आजची तरुण पिढी खूप जागरूक आहे. सोशल मीडिया आणि माहितीचा मोठा एक्सेस त्यांच्याकडे आहे. देशात आणि राज्यात काय घडते आहे, याबाबत त्यांचे स्वतःचे मत असते. पूर्वी मुलांना आई-वडिलांचा धाक होता. आज मुलांकडे स्वतःचे मत आहे आणि ते ते स्पष्टपणे व्यक्त करतात. ‘जेन झी’नंतर ‘जेन अल्फा’ अशी पुढची पिढीही येत आहे. माझे वय आता ५२ आहे. त्यामुळे या पिढीला माझ्यात नेतृत्व दिसत असेल आणि ते मला स्वीकारत असतील, तर ही निश्चितच आनंदाची बाब आहे.

प्रश्न : तुमचा विजय ‘राजे’ या नावामुळे होतो? राजघराण्यामुळे? आमदार म्हणून केलेल्या कामामुळे? की महाराजांच्या आशीर्वादामुळे?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : घराण्याचे नाव किंवा छत्रपतींचे नाव आमच्यापेक्षा इतरांनीच जास्त वापरले आहे. आम्हाला तेवढे वापरायलाच मिळाले नाही, असे माझे मत आहे. माझ्या वडिलांचे वलय मला नक्की मिळाले. त्यांनी १९७८ पासून काम केले. त्यांनी स्वतःचे नाव आणि एक वलय निर्माण केले. ते वलय आजही माझ्या मागे आहे.पण केवळ घराण्याच्या नावावर २५ वर्षे निवडून येता येत नाही. एखादी निवडणूक नावावर किंवा घराण्यावर जिंकता येईल; पण सातत्याने निवडून येण्यासाठी काम करावे लागते. लोकांमध्ये राहावे लागते. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे लागते. त्यांना वेळ द्यावा लागतो. तुम्ही कसे वागता, किती काम करता, हे सगळे लोक पाहतात.माझी ही पाचवी टर्म आहे. त्यामुळे नुसत्या राजे नावामुळे मतं पडतात, असे अजिबात नाही. घराण्याचा आशीर्वाद आहे; पण स्वतःचे कामही तितकेच महत्त्वाचे आहे.

अभयसिंहराजे मुख्यमंत्री झाले असते तर सातारचा चेहरामोहरा बदलला असता

प्रश्न : तुमचे वडील अभयसिंहराजे भोसले यांच्या काळात मुख्यमंत्रिपदाची संधी आली होती, पण नावांच्या गोंधळामुळे ती दूर गेली, अशी चर्चा आहे. हे खरे आहे का?

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : हा माझ्यापेक्षा माझ्या वडिलांच्या काळातील विषय आहे, पण त्यांनी कधीही त्याची खंत आपल्या कामात ठेवली नाही. त्या वेळी जे काही झाले असेल, ते राजकारणाचा भाग म्हणून झाले असेल. पण ‘मला मुख्यमंत्रिपद मिळाले असते’ किंवा ‘माझ्यावर अन्याय झाला’ अशी खंत त्यांनी कधीही व्यक्त केली नाही. पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांना संधी मिळाली नाही, हा विषय वेगळा. पण त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. मात्र माझे ठाम मत आहे की, त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असती तर सातारा जिल्ह्याचे शंभर टक्के नुकसान टळले असते. आज पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा विकासाच्या बाबतीत उल्लेख होतो; पण साताऱ्याचा अपेक्षित दबदबा दिसत नाही, सातारा ही छत्रपतींची गादी आहे. संभाजीराजे, शाहू महाराज यांचा या भूमीशी संबंध आहे. तरीही पश्चिम महाराष्ट्र म्हटले की साताऱ्याचा उल्लेख ज्या ताकदीने व्हायला हवा, तसा होत नाही. औद्योगिकीकरण विकास असो किंवा राजकीय प्रभाव असो, सातारा आणखी पुढे जाऊ शकला असता. माझ्या वडिलांना संधी मिळाली असती, तर जिल्ह्याचा विकास निश्चितच वेगळ्या पातळीवर झाला असता, असे मला वाटते.

वडिलांचा धाक...

तरुण पिढीतील बदल सांगताना शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कॉलेजजीवनातील एक रंजक आठवण सांगितली. मुंबईहून साताऱ्यात कॉलेजला गेल्यानंतर त्यांना मोटरसायकल घ्यायची होती. मात्र ही मागणी वडिलांकडे करण्यासाठी दोन महिने धाडस करावे लागले. अखेर त्यांनी मोटरसायकलची मागणी केल्यानंतर वडिलांनी, ‘आपली जीप आहे ना, ती वापरतोस; मोटरसायकल कशाला हवी?’ असा सवाल केला. पूर्वी आई-वडिलांचा धाक होता; आजची पिढी मात्र आपले मत स्पष्टपणे मांडते, असे सांगत त्यांनी या आठवणीच्या माध्यमातून दोन पिढ्यांमधील बदल अधोरेखित केला.

‘पुढारी’शी जिव्हाळ्याचे नाते...

मुलाखतीच्या अखेरीस शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी असलेल्या जुन्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण सांगितली. निवडून आल्यानंतर सुरुवातीच्या काळात जाधव साहेब यांनी फोन करून, ‘राजे, तुम्ही पक्षाचे आमदार नाही, तुम्ही माझे आमदार आहात,’ असे सांगितले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. या आठवणीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, राजकारणात मंत्रीपद येईल आणि जाईल; पदेही बदलत राहतील. मात्र माणसांमधील नाती आणि आयुष्यातील काही आठवणी कायम राहतात. ‘पुढारी’चे आणि जाधव साहेबांचे आपल्यावर असलेले प्रेम आपण कधीही विसरू शकणार नाही, असे सांगत त्यांनी ‘पुढारी’चे मनापासून आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news