

नवी मुंबई: शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने नवी मुंबई महापालिका मुख्यालयात गणवेश कधी मिळणार असा सवाल करीत मनसे आणि उबाठाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर १२ जुलैपर्यंत गणवेश देण्याचे आश्वासन उपायुक्त शिक्षण यांनी दिल आहे.
१५ जूनपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजूनही गणवेश मिळाले नाहीत. त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेत एकच गोंधळ घातला. जून महिना उजाडण्यापूर्वी खरेदी प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असताना, दरवेळेस ऑगस्ट-सप्टेंबर महिना का उजाडतो?
या विलंबासाठी कारणीभूत असलेल्या शिक्षण विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. पुरवण्यात येणाऱ्या गणवेश आणि साहित्याच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, त्याची योग्य तपासणी व्हावी अशी मागणी केली. आठवड्याभरात प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये गणवेश पडला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला.
यानंतर शिक्षण उपायुक्त यांनी १५ जुलैपर्यंत गणवेश दिले जातील असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्ह्यप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक नंदा काटे, मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई, मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, दशरथ सुरवसे व आदी उपस्थित होते.
पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध
महापालिकेच्या एकूण ५७ प्राथमिक शाळा आणि २३ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधील एकूण विद्यार्थी संख्या ४८ हजार एवढी आहे. या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. प्रशासनाच्या या उदासीन आणि ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.