

गौरीशंकर घाळे, मुंबई
महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर आता 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकांच्या कुस्तीचा फड रंगणार. महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर प्रचार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निवडणुकांसाठीही राबतील. ‘आपल्यासाठी राबणार्या कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत. नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठा पणाला लावायला हवी,’ हे त्यांचेच शब्द.
साहजिकच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठीही फडणवीस मेहनत घेणार, याबाबत दुमत असण्याचे काही कारण नाही. राज्यातील 29 महापालिकांसाठी फडणवीसांनी तब्बल 37 सभा घेतल्या होत्या. मुंबईत सात, आपले गृह शहर असलेल्या नागपुरात पाच, तर पुण्यात दोन सभांना संबोधित करणार्या फडणवीसांनी प्रत्येक महापालिकेत किमान एक सभा होईल, हे कटाक्षाने पाहिले. या प्रचार सभांच्या संख्येपेक्षा सभेतील त्यांची मांडणी अधिक महत्त्वाची आहे. फडणवीसांनी अन्य नेत्यांच्या तुलनेत जास्त सभा केल्या, त्यांनी मोठी मेहनत घेतली या बाबी तर आहेतच. त्यांनी यानिमित्ताने जी मेहनत घेतली तशी मेहनत विरोधी पक्षातील कोणा नेत्याने घेतल्याचे दिसले नाही.
निवडणुकीसाठीचे नियोजन, प्रचारासाठी घेतलेली मेहनत यापेक्षा काकणभर अधिक महत्त्व आहे ते त्यांनी केलेल्या मांडणीला. मुंबईचा अपवाद वगळता अन्य कुठल्याही महापालिकेच्या प्रचारात त्यांनी टीकेचा सूर आळवला नाही. त्या त्या शहरासाठी आजवर सरकार म्हणून काय केले आणि सत्ता आल्यास काय करणार, अशीच त्यांची मांडणी होती. कुठेही प्रतिस्पर्ध्यांना बोल लावले नाही, टीका केली नाही. मुंबई वगळता अन्यत्र कुठे विरोधी नेत्यांना बोल लावले असतील, तर दाखवून द्या, असे आव्हानच त्यांनी दिले होते. मी फक्त विकास मांडल्याचे ते आवर्जून सांगत.
एकीकडे राजकीय संवाद, भाषेचा स्तर घसरत असल्याची ओरड होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणीवपूर्वक केलेला विकासकेंद्रित प्रचार महत्त्वाचा ठरतो. राजकारणाच्या अभद्र आणि शिवराळ भाषेच्या पंक्तीत आपण नाही, हे यानिमत्ताने फडणवीसांनी अधोरेखित केले. प्रचारसभांच्या जोडीलाच त्यांनी कोल्हापूर, नागपूर, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकट मुलाखती दिल्या. प्रसिद्ध कलाकारांना दिलेल्या या प्रकट मुलाखतीतही शहरांच्या विकासाचा रोडमॅप फडणवीस मांडते झाले.
ग्रामीण जीवनाचे आकर्षण किंवा ओढ कितीही मोहविणारी असली तरी महाराष्ट्र हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे हे वास्तव आहे. हे वास्तव लक्षात घेत नगरनियोजन व्हायला हवे, यावर फडणवीसांचा भर होता. या सभा आणि मुलाखतीत फडणवीस प्रत्येक शहराचा पट उलगडत होते. हा त्या त्या शहराशी केलेला त्यांचा संवाद होता. एक नेता जेव्हा विकासाची मांडणी करतो, त्यासाठीचे टप्पे सांगतो, काय काय करणार आणि कसे करणार याचा आलेख मांडतो तेव्हा ती मांडणी राजकीय भूमिकेच्या पलीकडे जाते. एक नेता आणि समोरचा मतदार याच्यात झालेला एक अनौपचारिक करार बनतो. तुमचा शब्द आणि आमचे मत, असे ते स्वरूप बनते. एका अर्थाने प्रत्येक मतदाराला फडणवीसांनी दिलेला तो व्यक्तिगत शब्द आहे. हा शब्द भाजपचे नगरसेवक आणि महापौर कसा पूर्ण करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
फडणवीसांना आव्हान देण्यात विरोधक मागे
प्रशासन असो किंवा पक्षीय राजकारण, अविरत-अविश्रांत परिश्रमाच्या आधारे मुख्यमंत्री फडणवीस स्वतःचा पट मांडत आहेत. त्याला आव्हान द्यायचे असेल तर विरोधी नेत्यांना स्वतःचा पट त्याहून मोठा करावा लागेल. फडणवीसांच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचे व्हिजन मांडावे लागेल. तूर्तास तशी अविरत आणि अविश्रांत कष्ट उपसण्याची तयारी असलेले नेते विरोधी गोटात दिसत नाहीत.
फडणवीसांनी दाखवून दिला आपला स्ट्राईक रेट
एका प्रचारातून दुसर्या निवडणुकीतील प्रचाराकडे मोर्चा वळविण्यापूर्वी फडणवीस दावोसच्या दौर्यावर होते. पालिका विजयाचा गुलाल राजकीय आसमंतात ताजा असतानाच ते महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला पोहोचले. तिथे 30 लाख कोटींच्या विक्रमी गुंतवणूक करारांवर सह्या झाल्या. आणखी 12 लाख कोटींच्या गुंतवणुकीची प्राथमिक बोलणीही केली. गेल्या वर्षीच्या दावोस बैठकीतून भारताच्या सर्व राज्यांत आलेली गुंतवणूक होती 20 लाख कोटी. यंदा एकट्या महाराष्ट्रात आलेली गुंतवणूकच 30 लाख कोटींच्या घरात आहे. गेल्या वर्षीची 75 टक्के गुंतवणूक प्रत्यक्षात उतरल्याचे सांगत फडणवीसांनी आपला स्ट्राईक रेट इथेही उत्तमच असल्याचे दाखवून दिले आहे.