

Priya Marathe
मुंबई : 'पवित्र रिश्ता', 'तुझेचं गीत मी गात आहे', 'तू तिथे मी', यासारख्या मराठी आणि हिंदी मालिकांमधून अभिनयाची अमीट छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री प्रिया मराठेचं रविवारी (दि. ३१) निधन झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांची कर्करोगाशी झुंज अखेर संपली. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे यांनी अनेक मालिकेतील आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका आरोग्याच्या काराणास्तव तिने मध्येच सोडली होती. प्रिया मराठेचा जन्म ठाणे येथे २३ एप्रिल १९८७ रोजी झाला होता. २००६ मध्ये आलेल्या 'या सुखांनो या' या मराठी मालिकेत तिने भूमिका करून आपल्या अभिनयास सुरुवात केली. सर्वाधिक गाजलेली हिंदी मालिका 'पवित्र रिश्ता' मध्ये तिने भूमिका साकारली होती.
'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी', 'कॉमेडी सर्कस' या हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये तिने काम केले. 'तू तिथे मी' या मालिकेतील त्यांचा अभिनय लोकांच्या मनात घर करून गेला. मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'चार दिवस सासूचे' यात प्रियाची प्रमुख भूमिका होती. मराठी चित्रपट 'विघ्नहर्ता महागणपती' (२०१६) आणि 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' (२०१६) मध्येपण तिने काम केले.