Pudhari Mahasummit 2026: सहकाराच्या माध्‍यमातून जनतेला ताकद देण्‍याचा प्रयत्‍न; आमदार प्रवीण दरेकर यांची भूमिका

भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कष्टाळू चालकांसाठी ‘नमो टॅक्सी’ योजना सुरू केल्याची माहिती दिली. सहकारातून रोजगारनिर्मितीवरही त्यांनी भर दिला.
Pudhari Mahasummit 2026
Pudhari Mahasummit 2026Pudhari
Published on
Updated on

मुंबई: सहकार हा माझा जिव्‍हाळ्याचा विषय आहे. सहकारातून रोजगारनिर्मिती होते. विशेषत: तळागाळातील वर्गाला त्‍याचा फायदा होतो. म्‍हणूनच या माध्‍यमातून लोकांना ताकद देण्‍याचा प्रयत्‍न मी करत आहे. त्‍याचाच एक भाग म्हणून आता कष्‍टाळू चालकांसाठी नमो टॅक्‍सीची योजना सुरू केली आहे, अशी भूमिका भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे मांडली.

मंगळवारी हॅाटेल ट्रायडेंटमध्‍ये पुढारी न्‍यूजच्‍या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'महासमिट २६' मध्‍ये पुढारीच्या मल्‍टिमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर यांनी घेतलेल्‍या मुलाखतीदरम्‍यान दरेकर बोलत होते.

या दरम्‍यान दरेकर यांनी अनेक विषयांना स्‍पर्श केला. मुंबई बँकेच्‍या माध्‍यमातून स्‍वयंपुनर्विकास योजना आणून मूळ मालकांना व रहिवाशांना न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. मुंबईत सुमारे १३ हजार इमारती मोडकळीस आल्‍या आहेत.

सुमारे ५० हजार सोसायट्‍या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्‍या स्‍वयंपुनर्विकास योजनेतून उभ्‍या राहाव्‍यात, अशी इच्‍छा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. विविध कामे करताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्‍याचे दरेकर यांनी नमूद केले. प्रवीण दरेकर यांच्याशी झालेली ही प्रश्नोत्तरे-

प्रश्‍न : भाजपामध्ये आल्यानंतर आपल्याला काय वाटते?

प्रवीण दरेकर : राष्ट्रीय विचार, विकासाचे व्हिजन आणि समाजासाठी काम करण्यासाठी संधी पाहून आपण भाजपामध्ये आलो. यापूर्वी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होतो. तिथेसुद्धा हाच विचार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर प्रभावित होऊनच मी भाजपामध्ये आला. पक्ष आणि फडणवीस यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. भाजपामध्ये अशी खूप माणसे आहेत.

प्रश्‍न : बाहेरचे लोक जेव्हा पक्षात येतात तेव्हा किती वर्षांनी भाजपावाले नवीन लोकांना आपले मानतात?

प्रवीण दरेकर : भाजपामध्ये बाहेरचा आणि आतला असा कधी विचार नसतो. उदाहरणार्थ, एका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर त्यांची ज्येष्ठता कधी कमी होत नसते. तोच प्रकार राजकारणात आणि राजकीय पक्षातसुद्धा केला जातो. यापूर्वी त्याने जुन्या पक्षात केलेल्या कामाचाही प्राधान्याने विचार होतो. असे असले तरी, नवीन लोकांनी जुन्या लोकांना लाजवेल असे काम केले पाहिजे. हे करताना त्यांनी जुन्यांचाही सन्मान केला पाहिजे.

प्रश्‍न : मनसेपूर्वी आपण शिवसेनेत होतात. शिवसेनेची महानगरपालिकेत सत्ता असताना या पक्षाने मुंबईच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. सामान्य माणसाचे प्रश्न सोडविले नाहीत. तुम्ही आता भाजपाचा चेहरा आहात. आता मुंबईकरांसाठी आपण काय करत आहात?

प्रवीण दरेकर : मी शिवसेनेमध्ये असताना अनेक आंदोलने केली आहेत, आता ती करावी लागत नाहीत. पक्ष आणि सत्तेच्या माध्यमातून सामान्य माणसांचे प्रश्न सोडवत आहे. मुंबईतील सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मी चेअरमन आहे. या माध्यमातून मुंबईकरांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबवत आहे.

मुंबईतील माथाडी, पोलीस आणि गिरणी कामगारांच्या गृहनिर्माण योजनांना निधी देण्याचे काम केलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला दरमहा पंधराशे रुपये मानधन दिले जात आहे. अशा महिलांनी उद्योग निर्माण करावा, यासाठी त्यांना कर्ज देत आहोत. आतापर्यंत पाच हजार महिलांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरु केला आहे.

राज्य सरकारची आई नावाची योजना आहे. या योजनेचे सध्या अठराशे कोटी रुपये पडून आहेत. आई आणि नमो टॅक्सी या योजनेची सांगड घालण्याचे काम सध्या सुरू आहे. ओला, उबेरसारख्या कंपन्यांच्या गाडीवर ड्रायव्हरचे काम करणाऱ्यांच्या हातात घाम गाळूनही समाधानकारक पैसा येत नाही.

सगळा नफा या कंपन्या मिळवत आहेत. अशा चालकांसाठी आपण नमो टॅक्सी योजना सुरु केली आहे. मुंबईत लवकरच नमो टॅक्सीच्या दोन हजार गाड्या रस्त्यावर दिसणार आहेत. या ड्रायव्हरला मुंबई बँकेच्या माध्यमातून कर्ज दिले जाणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना अडीच लाख रुपयांची सवलत दिली जाणार आहे. इथे ड्रायव्हर हाच मालक असेल.

यामध्ये किमान ५०० महिला ड्रायव्हर असतील. माझ्या मुंबईतील प्रवास करणाऱ्या बहिणी सुरक्षित राहाव्यात हा यामागील उद्देश आहे. याशिवाय संबंधित महिला ड्रायव्हरला नमो टॅक्सीच्या माध्यमातून रोजगारही मिळेल. नमो टॅक्सीसाठी आरटीओची मदत घेतली असून आतापर्यंत २८०० वाहनांची नोंदणी झाली आहे.

प्रश्‍न : टॅक्सी आणि रिक्षा चालकाला मराठी आलेच पाहिजे अशी अट घालण्यात आली आहे. याविषयी काय वाटते?

प्रवीण दरेकर : प्रत्येक रिक्षा, टॅक्सी चालकाला स्थानिक भाषा आलीच पाहिजे हा नियम आहे. आतापर्यंत त्याची अंमलबजावणी होत नव्हती. प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेचा सन्मान केला पाहिजे. आपण इतर राज्यात गेल्यानंतर तेथील भाषा बोलतो तसे मुंबईतील अमराठी बांधवांनीही मराठी शिकली पाहिजे. रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी सरकारने दिला आहे. ते मराठी भाषा शिकतील, असा मला विश्वास आहे.

प्रश्‍न : मुंबईत घरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक चाळी आणि इमारती मोडकळीस आल्या आहेत. जुने मुंबईकर या शहराच्या बाहेर जात आहेत. अशा लोकांना आपण कसे थांबवू शकाल?

प्रवीण दरेकर : जुन्या मुंबईकरांनी हे शहर सोडू नये यासाठी स्वयंपुनर्विकास योजना आणली आहे. यापूर्वी, जुनी इमारत विकासाच्या नावाखाली बिल्डर प्रचंड नफा कमावत होते. मूळ मालकाला कमी क्षेत्रफळाची सदनिका मिळत असे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून स्वयंपुनर्विकासासाठी इमारतीमधील रहिवाशांना कर्ज देत आहोत.

इमारतीच्या जागेपासून तर इमारत पूर्ण होईपर्यंत आमचे लोक गृहनिर्माण संस्थांना सहकार्य करतात. यामुळे सदनिका मालकाला पूर्वीच्या क्षेत्रफळापेक्षा अधिकची जागा उपलब्ध होत आहे. मुंबईतील सुमारे १३ हजार इमारती मोडकळीस आल्या आहेत. या सर्व इमारती स्वयंपुनर्विकास योजनेतून उभ्या रहाव्यात, अशी माझी इच्छा आहे.

केवळ सहकारी गृहनिर्माण संस्थाच नव्हे तर एसआरएच्या जुना इमारतीमधील रहिवाशांनी स्वयं पुनर्विविकास योजनेच्या माध्यमातून आपल्या इमारती उभाराव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. इतकेच नाही तर झोपडपट्टी विभागातसुद्धा ही योजना सुरू करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत.

प्रश्‍न : नफा कमवण्याच्या उद्देशाने मुंबई बँक या क्षेत्रात वळली असल्याचा आरोप काही बिल्डर करत आहेत.

प्रवीण दरेकर : मुंबई बँक ही बिल्डर नाही. उलट विकासाच्या नावाखाली केवळ मोक्याच्या जागेवर असलेल्या जुन्या इमारती बिल्डर घेतात. घरमालकांना कमी क्षेत्रफळाची सदनिका देऊन ते नफा कमवतात. दिलेल्या मुदतीत इमारत उभी करत नाहीत. अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाल्याचे आपण पाहिले आहे.

हे टाळण्यासाठी आपण स्वयंपुनर्विकास योजना सुरू केली. त्‍यासाठी गोरेगावला गृहनिर्माण संस्थांच्या चेअरमन आणि सेक्रेटरीचा मेळावा घेतला. स्वयंपुनर्विकास योजनेचा शुद्ध हेतू आणि सर्वसामान्य माणसांची मागणी विचारात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याच मेळाव्यात २० पैकी १८ मागण्या तात्काळ मंजूर केल्या व महिनाभरात १८ शासन आदेशही काढले. यामुळे स्वयंपुनर्विकास योजनेतील अडथळे दूर झाले.

एक इमारत उभी करण्यासाठी विकासकाला तीन-चार वर्ष तरी लागतात. आम्ही केवळ अडीच वर्षात इमारत उभी करतो. आतापर्यंत एकाही गृहनिर्माण संस्थेने मुंबई बँकेचा एक रुपयाही थकवला नाही. बिल्डरच्या सांगण्यावरून ज्यांनी ज्यांनी स्वयंपुनर्विकास योजनेला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, अशा सरकारी अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई केली आहे. पण सगळेच अधिकारी वाईट नसतात.

विशेष म्हणजे, मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकास योजनेच्या माध्यमातून इमारती उभ्या राहत असल्याचे पाहून, या योजनेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारचे नुकतेच पथक मुंबईत येवून गेले. गरिबांच्या विकासासाठी सुरू केलेली ही योजना माझा श्वास बनली आहे.

देशातील इतर राज्यातही अनेक मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. अशा मोडकळीस आलेल्या इमारती स्वयंपुनर्विकासच्या माध्यमातून उभ्या राहाव्यात यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेणार आहोत.

प्रश्‍न : आपल्याला गृहनिर्माण क्षेत्र आवडतं की सहकार?

प्रवीण दरेकर : या दोन्ही क्षेत्राची नाळ सर्वसामान्यांशी जोडली आहे. त्यामुळे ही दोन्ही क्षेत्रे माझ्या आवडीचीच आहेत. सहकाराचे क्षेत्र तर खूप मोठे आहे. लोकांना या माध्यमातून ताकद देता येते.

प्रश्‍न : मंत्री नसतानाही आपण या क्षेत्रासाठी भरीव काम करता. काही अडथळे येत नाहीत का?

प्रवीण दरेकर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मला या सर्व कामांसाठी नेहमीच सहकार्य मिळते. हे खरे आहे की सत्ता तुमच्या कामांना गती देते. मी मंत्री नसलो तरी एखादे काम मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर संबंधित मंत्री ते करतात. ही सर्व सर्वसामान्यांची कामे असल्यामुळे माझ्या कामांना एकही मंत्री टाळत नाहीत. पदाशिवायही चांगले काम करता येते.

प्रश्‍न : सहकाराच्या माध्यमातूनकाही नेते गब्बर झाले आहेत.अशा नेत्यांच्या विरोधातआपण सहकाराच्या माध्यमातून लढत आहात

प्रवीण दरेकर : सहकार हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे कारण या क्षेत्रातून अनेक गोरगरिबांना रोजगार उपलब्ध होतो. विशेषतः शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा झाल्याचे आपण पाहतो. या क्षेत्राचा वापर करून कोण गब्बर झाले याकडे मला पाहायचे नाही. आपण या क्षेत्रात केवळ चांगल्या उद्देशानेच काम करत आहोत.

सहकारातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी १०७ वर्षांपूर्वी या राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना करण्यात आली होती. सध्या या संघाचा मी अध्यक्ष आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या संघाच्या अनेक योजना बंद पडल्याचे आपल्या लक्षात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने आमच्या मागण्या मंजूर केल्या. बँका पतसंस्था आणि सहकारी साखर कारखान्यांना ही मुंबई बँक कर्ज देते. या संस्थांचा विकास व्हावा हाच माझा उद्देश आहे. त्यामुळे लोकांत आता मी विश्वास निर्माण केला आहे. राज्य सहकारी संघालाही नवी गती देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news