

मुंबई : प्रभादेवी पूलबाधितांना एमएमआरडीएकडून देण्यात आलेल्या घरांवर काही रहिवाशांचा आक्षेप आहे. त्यामुळे 12 जणांना ही घरे बदलून देण्याची तयारी एमएमआरडीएने दाखवली आहे.
प्रभादेवी पूल तोडून तेथे एमएमआरडीएकडून दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती यात बाधित झाल्या आहेत. त्यांतील 83 रहिवाशांना कुर्ला येथे कायमस्वरुपी घरे देण्यात येणार होती; मात्र जवळपासच्या परिसरातच घरे उपलब्ध व्हावीत, अशी रहिवाशांची मागणी होती. त्यामुळे याच परिसरात म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून उपलब्ध झालेली अतिरिक्त घरे त्यांना देण्यात आली. यासाठी एमएमआरडीएने म्हाडाला 100 कोटीही दिले.
अँटॉप हिल, दादर पूर्व आणि भायखळा येथील घरांचा परिसर योग्य नसल्याचे सांगत रहिवाशांनी ही घरे स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे 12 रहिवाशांना घरे बदलून दिली जाणार आहेत. याबाबतचे पत्र एमएमआरडीएने म्हाडाला दिले आहे. म्हाडानेही घरे बदलून देण्याची तयारी दर्शवली आहे.