

मुंबई : पॉलिटेक्निकमधील शिक्षकांना उद्योगजगताशी प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) पुण्यातील बीएसएनएलच्या झोनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटरमध्ये औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमांची घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सत्रासाठीचे वेळापत्रक मंडळाने नुकतेच जाहीर केले असून, यात विविध दूरसंचार विषयांवरील प्रशिक्षणांचा समावेश आहे.
राज्यभरातील शासकीय व अनुदानित संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक इंटर्नशिप आहे. प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव दिला जात आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने आता पॉलिटेक्निकमधील शिक्षकांना औद्योगिक प्रशिक्षणातून अनेक फायदे देण्याचा विचार केला आहे. प्रगत तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष उपकरणे व नेटवर्क्सच्या साहाय्याने होणार आहे. या प्रशिक्षणातून शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, प्रयोगशाळेबाहेरील व्यवहार्य पद्धती शिकता येतील.
त्यामुळे त्यांच्या अध्यापनात व्यवहार्यता वाढून विद्यार्थ्यांना विषय अधिक सोप्या आणि वास्तवाशी निगडित पद्धतीने समजेल. यामुळे अभ्यासक्रम परिपूर्ण शिकवता येईल. औद्योगिक प्रशिक्षणामुळे शिक्षकांमधील कौशल्यवृद्धी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
उद्योगाशी जोडलेला हा अनुभव विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठीही उपयुक्त ठरेल. रोजगार बाजारपेठेत आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अंदाज विद्यार्थ्यांना अधिक स्पष्टपणे मिळेल. राज्यातील पॉलिटेक्निक संस्थांनी शिक्षकांना संबंधित संस्थेच्या प्राचार्यांच्या शिफारशीसह अर्ज करणे बंधनकारक आहे. संस्थेच्या लेटरहेडवर दिलेल्या तपशिलांनुसार सहभागी शिक्षकांचे नाव, संस्था कोड, शाखा, पदनाम, ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
सहभागी होणारे शिक्षक मंडळ मान्यताप्राप्त असणे बंधनकारक असल्याचेही एमएसबीटीईने स्पष्ट केले आहे. प्राचार्यांची शिफारसपत्र सह संस्था शिक्कामोर्तब कागदपत्र सादर करावी लागतील. यात सहभागी शिक्षकांचे नाव, संस्था कोड, शाखा, पदनाम, तसेच ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. सहभागी अध्यापक मंडळाकडून मान्यताप्राप्त असणे बंधनकारक आहे.
पॉलिटेक्निक शिक्षकांना या 66 प्रशिक्षणामुळे उद्योग क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, पदविका अभ्यासक्रम अधिक परिपूर्ण व व्यवहार्य पद्धतीने शिकवता येणार आहे. प्रत्यक्ष उपकरणे व आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित प्रयोगांचा अनुभव शिक्षकांना मिळाल्याने विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल.
डॉ. प्रमोद नाईक, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ
चार प्रशिक्षण गटांचा समावेश
बीएसएनएल झेडटीटीसी पुणे येथे होणाऱ्या प्रशिक्षणांमध्ये एकूण चार गटांचा समावेश करण्यात आला आहे. 'डेटा कम्युनिकेशन' या विषयाचे प्रशिक्षण २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडेल. त्यानंतर 'मोबाईल कम्युनिकेशन' विषयाचे प्रशिक्षण १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान होईल. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान 'स्विचिंग व बेसिक टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर' या विषयाचे प्रशिक्षण होणार आहे. शेवटचा गट ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान 'ट्रान्समिशन व एफटीटीएच टेक्नॉलॉजी' या विषयावर आधारित असेल. प्रत्येक गटासाठी ३० जागांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.