

मुंबई : पवन होन्याळकर
राज्यातील तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेत यंदा पारंपरिक शाखांबरोबरच नव्या तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रमांना यंदाच्या प्रवेशात जोरदार प्रतिसाद दिला आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरींग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या कायम लोकप्रिय राहिलेल्या शाखांबरोबरच ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’लाही विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. दहावीनंतर आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल दिसला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या गेल्या तीन शैक्षणिक वर्षांच्या आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये 1 लाख 11 हजार 286 जागांपैकी 86 हजार 473 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. म्हणजेच 77.70 टक्के प्रवेश निश्चित झाले. गेल्या वर्षी 2024-25 मध्ये 1 लाख 18 हजार 524 पैकी 95 हजार 291 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ही टक्केवारी 80.39 वर पोहोचली. यंदा तर सर्वाधिक 1 लाख 40 हजार 34 अर्ज आले होते.
या विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद प्रवेशाच्या स्थितीला बळकटी देणारा ठरला आहे. राज्यातील 400 संस्थात 1 लाख 22 हजार 324 जागा होत्या त्यापैकी तब्बल 1 लाख 07 हजार 545 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. हे प्रमाण 87.91 टक्के इतके आहे. 15 सप्टेंबर ही प्रवेशाची अंतिम मुदत असून यात आणखी वाढ होईल.
चालू वर्षी विद्यार्थ्यांचा कल स्पष्टपणे आधुनिक व नवनव्या अभ्यासक्रमांकडे वळलेला दिसला. सर्वाधिक प्रतिसाद कॉम्प्युटर इंजिनिअरींगला 20 हजार 905 प्रवेश झाले त्यानतंर मेकॅनिकल इंजिनिअरींगला 20 हजार 593, इलेक्ट्रिकलला 15 हजार 768 आणि सिव्हिलला 16 हजार 441 प्रवेश घेतले आहेत. विभागनिहाय चित्र पाहिले तर, मुंबई विभागात कॉम्प्युटर (2 हजार 999), मेकॅनिकल (2 हजार 549), इंजिनिअरींग यानंतर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीला 1 हजार 224 असा प्रतिसाद मिळाला. तर पुण्यात तर यंदा उलट झाले आहे.
कॉम्प्युटरचे प्रवेश कमी झाले आहेत. गेल्यावर्षी 7 हजार 127 प्रवेश झाले होते. यंदा हा आकडा 6 हजार 870 वर थांबला आहे. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या शाखांमध्ये 11 हजारांहून अधिक प्रवेश झाले. मेकॅनिकल व सिव्हिल या पारंपरिक शाखांकडे अधिक कल पुण्यातून दिसत आहे.
अमरावती विभागात मेकॅनिकल व सिव्हिल अभियांत्रिकी या पारंपरिक शाखांना प्रतिसाद कायम राहिला. छत्रपती संभाजीनगर विभागात कॉम्प्युटर, मॅकनिकल इंजिनिअरींग सर्वाधिक लोकप्रिय ठरली असून इलेक्ट्रिकल व इले. अॅण्ड टेलि. कम्युनिकेशनलाही विद्यार्थ्यांनी पसंती दिली. नागपूर विभागात अजूनही इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या जुन्या पसंतीच्या शाखा प्रभावी ठरल्या आहेत. नाशिक विभागात कॉम्प्युटर आणि मेकॅनिकलला सर्वाधिक ओढा मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा कल लक्षात घेतला तर पारंपरिक शाखांची पकड काही प्रमाणात कमी झाली आहे. मागील काळात मेकॅनिकल आणि सिव्हिल यांच्याकडे विद्यार्थी जास्त वळत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून कॉम्प्युटर इंजिनिअरींगने सर्व विभागात आघाडी घेतली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या शहरी भागांत आयटी आणि आधुनिक अभ्यासक्रमांची मागणी झपाट्याने वाढली आहे.
दुसरीकडे, अमरावती आणि नागपूरसारख्या विभागांत अजूनही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या पारंपरिक शाखांचा प्रभाव कायम आहे. एकंदरित पाहता, शहरी भागांत आधुनिक अभ्यासक्रमांना जास्त पसंती मिळत आहे, तर ग्रामीण व मध्य महाराष्ट्रात पारंपरिक शाखांची निवड अजूनही आहे.
2025-26 मध्ये असे झाले प्रवेश
अभ्यासक्रम जागा प्रवेश
कॉम्प्युटर इंजिनिअरींग 22,406 20,905
मेकॅनिकल इंजिनिअरींग 25,746 20,593
सिव्हिल इंजिनिअरींग 20206 15,853
इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग 18,131 15,768
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 9945 8,133
प्रवेशाचा तीन वर्षांचा आलेख
शैक्षणिक वर्ष एकूण जागा झालेले प्रवेश टक्केवारी
2025-26 1,22,324 1,07, 545 87.91
2024-25 1,18,524 95,291 80.39
2023-24 1,11,286 86,473 77.70
अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी रोजगार व उच्च शिक्षणाचा उत्तम पर्याय ठरत आहे. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांना यंदा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. जनजागृती मोहिमा, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार याचा परिणाम आता प्रवेशातही दिसून आला.
डॉ. विनोद मोहितकर संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय