

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ ड्रोन उडविले जात असल्याच्या व्हिडीओने राजकीय वादंगाला नवीन विषय दिला. मात्र बीकेसी ते कुर्ला या भागातील अंतर्गत वाहतुकीला चालना देण्यासाठी एमएमआरडीएतर्फे पॉड टॅक्सी प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 8 आणि 9 नोव्हेंबरला ड्रोन सर्वेक्षण करण्यात आल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाने केला.
या ड्रोनवरून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू झाले. कोणते सर्वेक्षण घरात डोकावण्याचा आणि पकडले गेल्यावर पळून जाण्याची परवानगी देतो, असा प्रश्न करत आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाच्या खुलाशालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
ड्रोनच्या माध्यमातून मातोश्री निवासस्थानावर कोण टेहळणी करत आहे का, कोणी तरी पाळत ठेवून आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या. विशेषतः ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मातोश्रीवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आले. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अनिल परब, अंबादास दानवे यांच्यासह मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही यानिमित्ताने राज्य सरकारला लक्ष्य केले.
वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक या परिसरात बेस्ट बसची सेवा उपलब्ध आहे. मात्र त्याचे सक्षमीकरण झालेले नाही. याउलट, याच परिसरात एमएमआरडीएच्या वतीने पॉड टॅक्सी सुरू केली जाणार आहे. यावर एमएमआरडीएचा पैसा खर्च होणार नसला तरीही खासगी कंपनीला कमाईचा मार्ग मोकळा होणार आहे. पॉड टॅक्सीच्या उत्पन्नातील काही हिस्सा एमएमआरडीएलाही मिळणार आहे. पॉड टॅक्सीचे तिकीट मात्र बसपेक्षा महाग असणार आहे.