

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुकीत सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांनी मिळवलेले घवघवीत यश. आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत या वारसांनी विरोधकांना धूळ चारली असून, अनेक मतदारसंघांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील यांनी पारगाव जरकवाडी गटातून 2,130 मतांची निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला.
जिल्ह्यात हाय-व्होल्टेज ठरलेल्या लढतींमध्ये तानाजी सावंतांच्या पुतण्याने विक्रमी बाजी मारली आहे. माढा तालुक्यातील मानेगाव गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर 6,800 मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवला. भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही दहिगाव गटातून विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी एन्ट्री केली आहे.
कोकणातील राजकीय बालेकिल्ल्यांमध्येही नेत्यांच्या मुलांनी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये आ. भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी असगोली गटातून पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व राखत विजय संपादन केला. रायगडमध्ये आ. भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला.