

Maharashtra Police PSI Departmental Exam
मुंबई : मागील तीन वर्षांपासून बंद केलेली पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी खात्यांतर्गतची परीक्षा पुन्हा सुरू करण्यास मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली असून, या परीक्षेतून पोलीस खात्यांतर्गत एकूण रिक्त पदांच्या २५ टक्के पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत २५ टक्के आरक्षणातून परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती व अनुभवी पोलिसांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र, फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पुढाकार घेत, एप्रिलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह धरला आणि बुधवारी ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कमी वयातच पीएसआय पद
पोलिस कॉन्स्टेबलना त्यांच्या सेवाकालाच्या शेवटच्या बढतीद्वारे हे पद मिळते. अशावेळी त्यांना पीएसआय म्हणून फारतर दोन-तीन वर्षेच काम करता येते. परंतु विभागीय परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्यांना कमी वयातच पीएसआय पद मिळते. त्यांना पुढील २० ते २५ वर्षे हे पद तसेच त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते.
पोलिस दलातील मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलिस अंमलदारांना अधिकारी म्हणून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयामुळे पोलिस दलात नवे चैतन्य निर्माण होईल, असा विश्वास गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.