

मुंंबई: पॉक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील पीडित मुलीने आरोपीशी लग्न केल्याने खटल्याला नाट्यमय वळण लागले आणि विशेष पॉक्सो न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. भांडुपमध्ये घडलेल्या कथित अत्याचाराच्या घटनेतील पीडित मुलीसह तिची आई फितूर बनल्याने विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा सिंह यांनी हा निकाल दिला.
फेब्रुवारी 2021 मध्ये भांडुप (पश्चिम) परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने (पीडितेची आई) पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार 15 वर्षांची मुलगी आणि आरोपी यांच्यात मैत्री होती. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सार्वजनिक शौचालयातून दोघे एकत्र बाहेर पडताना दिसले.
आईने विचारपूस केली असता, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून नोव्हेंबर 2019 ते मार्च 2020 दरम्यान वारंवार अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376 आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. तथापि, खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने पीडितेची आई आणि पीडित मुलगी यांची साक्ष नोंदवली. मात्र, दोघींनी पोलिसांमधील मूळ तक्रारीला पूर्णपणे नाकारले.