PM Modi WAVES 2025
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १) महाराष्ट्रदिनी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृक्श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज् २०२५) उद्घाटन केले. “भारतात निर्माण करा, जगासाठी तयार करा, ही संकल्पना स्वीकारण्याची योग्य वेळ आहे” असे म्हणत, भारतात येऊन जागतिक स्तरावरील कंटेंट तयार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोरंजन क्षेत्रातील निर्मात्यांना केलं.
'कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज' या घोषवाक्याने प्रेरित १ ते ४ मे दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील निर्माते, स्टार्टअप्स, उद्योजक आणि धोरणकर्ते एकत्र येणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, जग जेव्हा कथाकथनाच्या नवीन पद्धती शोधत असते, तेव्हा भारताकडे हजारो वर्षांच्या कालातीत, विचार करायला लावणाऱ्या आणि खरोखरच जागतिक कथांचा खजिना आहे. त्या (कथा) केवळ संस्कृतीबद्दलच नाही तर विज्ञान, शौर्य, कल्पनारम्य, धैर्याबद्दल देखील आहेत. आपला खजिना प्रचंड आहे आणि तो जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणे, नवीन पिढीसमोर सादर करणे ही वेव्हज प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. वेव्हज हे केवळ एक संक्षिप्त रूप नाही तर संस्कृती, सर्जनशीलता, सार्वत्रिक जोडणी, चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन, कथाकथन आणि सर्जनशीलतेचा भाग असलेल्या प्रत्येक गोष्टीची खरी लाट आहे, असेही मोदी म्हणाले.
"हे एक जागतिक व्यासपीठ आहे जे प्रत्येक कलाकार, निर्मात्याचे आहे. जिथे कोणताही तरुण नवीन कल्पना घेऊन सर्जनशील जगाशी जोडला जाईल. आजपासून ११२ वर्षांपूर्वी दादासाहेब फाळके निर्मित भारतातील पहिला राजा हरिश्चंद्रराजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला होता याची आठवण मोदी यांनी सांगितली.
जागतिक निर्मात्यांना आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत नेहमीच सभ्यतेच्या मोकळेपणाचे पालन करत आला आहे. पारशी आणि यहूदी बाहेरून आले आणि येथे एक झाले. जगभरातील कलाकृतींचे स्वागत करणे ही आपली ओळख आहे. जगभरातील निर्मात्यांनी मोठी स्वप्ने पहावी, त्यांनी इथे येऊन काम करावं आणि भारतीय प्रतिभेला ओळख द्यावी, असे ते म्हणाले.
भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि संगीतासाठी जागतिक केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे. लाईव्ह मनोरंजन उद्योग, विशेषतः लाईव्ह कॉन्सर्टमध्येही देशात वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे. सध्या, जागतिक अॅनिमेशन बाजारपेठ ४३० अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे आणि पुढील दशकात ती दुप्पट होण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक डिझाइन उद्योगाला जागतिक स्तरावर भरभराटीसाठी महत्त्वपूर्ण संधी देत असल्याचे मोद म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील ५ दिग्गज व्यक्तींच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे प्रकाशित केली.