PM Modi : किल्ल्याचा प्रत्येक दगड ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार; 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितली शिवरायांच्या किल्ल्यांची गौरवगाथा

युनेस्कोने मराठ्यांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या आपल्या रेडिओ कार्यक्रमातून या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक केले.
PM Modi
PM Modipudhari photo
Published on
Updated on

PM Modi Mann Ki Baat

नवी दिल्ली : "युनेस्कोने मराठ्यांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या किल्ल्यांपैकी प्रत्येक किल्ल्याशी इतिहासाचे एक पान जोडलेले आहे आणि येथील प्रत्येक दगड ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या आपल्या रेडिओ कार्यक्रमातून ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक केले.

'मन की बात'च्या १२४ व्या भागात बोलताना पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या गौरवास्पद इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले, "या १२ किल्ल्यांपैकी ११ किल्ले महाराष्ट्रात आहेत, तर एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. या प्रत्येक किल्ल्याचा स्वतःचा गौरवशाली इतिहास आहे." छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि दूरदृष्टीचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "साल्हेरचा किल्ला, जिथे मराठ्यांनी मुघलांचा दारूण पराभव केला. शिवनेरी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला; इतका सुरक्षित किल्ला की शत्रू त्याला कधीही भेदू शकला नाही. समुद्राच्या मधोमध बांधलेला खांदेरीचा किल्ला हे एक अद्भुत आश्चर्य आहे. शत्रूंनी त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य ते शक्य करून दाखवले."

पंतप्रधान मोदींनी सांगितली रायगड भेटीची आठवण

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या रायगड भेटीची आठवणही सांगितली. "प्रतापगड, जिथे अफझलखानाचा वध झाला, त्या पराक्रमाचा प्रतिध्वनी आजही किल्ल्याच्या भिंतींमध्ये घुमतो. विजयदुर्ग, जिथे गुप्त भुयारे होती, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी मी रायगडाला भेट दिली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालो होतो. तो अनुभव माझ्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा आहे," असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी पुढे नमूद केले की, भारतातील किल्ल्यांनी अनेक हल्ले आणि नैसर्गिक आपत्त्यांचा सामना केला, परंतु त्यांनी आपला स्वाभिमान कधीही झुकू दिला नाही. "देशाच्या इतर भागांमध्येही असे अद्भुत किल्ले आहेत. राजस्थानमधील चित्तोडगड, कुंभलगड, रणथंबोर, आमेर आणि जैसलमेरचे किल्ले जगप्रसिद्ध आहेत. कर्नाटकातील गुलबर्गा किल्लाही खूप भव्य आहे. चित्रदुर्ग किल्ल्याची विशालता पाहून आश्चर्य वाटते की, त्या काळात हा किल्ला कसा बांधला गेला असेल," असेही ते म्हणाले.

PM Modi
Devendra Fadnavis | ऐतिहासिक, अभिमानास्पद क्षण ! १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळताच मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

किल्ले आपल्या संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक

उत्तर प्रदेशातील किल्ल्यांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, "उत्तर प्रदेशातील बांदामध्ये कालिंजरचा किल्ला आहे. महमूद गझनवीने या किल्ल्यावर अनेक वेळा हल्ला केला, पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. बुंदेलखंडात ग्वाल्हेर, झाशी, दतिया, अजयगड, गढकुंडार आणि चंदेरी असे अनेक किल्ले आहेत. हे किल्ले केवळ विटा-दगडांचे बांधकाम नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. या किल्ल्यांच्या उंच भिंतींमधून आजही संस्कृती आणि स्वाभिमान डोकावतो."

मराठा लष्करी स्थापत्यशैली, भारताचा चिरस्थायी सांस्कृतिक वारसा

उल्लेखनीय आहे की, या महिन्याच्या सुरुवातीला जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या सत्रात, भारताच्या २०२४-२५ साठीच्या 'मराठा लष्करी स्थापत्यशैली' (Maratha Military Landscapes of India) या नामांकनाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले. हा मान मिळवणारे हे भारतातील ४४ वे स्थळ ठरले आहे. या जागतिक सन्मानामुळे भारताचा चिरस्थायी सांस्कृतिक वारसा, स्थापत्यकलेतील विविधता आणि ऐतिहासिक सातत्य जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे, असे सांस्कृतिक मंत्रालयाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news