

नवी मुंबई : पितृपक्षामुळे गवार, घेवडा, शेवगा, भेंडी, तोंडली आणि लाल भोपळा या भाज्यांना विशेष मागणी आली आहे.मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने या भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या या भाज्यांचे घाऊक दर साधारण ५० ते ७० रुपये किलोपर्यंत आहेत. किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना याच भाज्यांसाठी १०० ते १२० रुपये प्रतिकिलो मोजावे लागत आहेत. याशिवाय इतर भाज्यांच्या दरांतही मागील १५ दिवसांच्या तुलनेत सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई एपीएमसीत घाऊक भाजीपाला बाजारात सध्या दररोज सुमारे ५५० गाड्यांची आवक होत आहे.
एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात नाशिक, पुणे आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. याशिवाय गुजरात आणि कर्नाटकातूनही भाजीपाल्याची आवक होते. मात्र, पावसाने उघडीप घेतल्याने काही भागांतील उत्पादनावर परिणाम होत आहे. पुढील काही दिवसांत भाज्यांची मागणी कायम राहिली आणि आवक वाढली नाही, तर भाज्यांच्या दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पितृपक्षात पितरांना जेवण घालणेही चांगलेच महागले आहे.
पितृपक्षाचा काळ सुरू झाल्याने घराघरांत पितरांना नैवेद्य करण्याची तयारी सुरू झाली आहे. या काळात विविध प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्यासाठी वापर केला जात असल्याने काही विशिष्ट भाज्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, पावसाने लवकर उघडीप दिल्याने काही भागांत पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होत आहे. मागणी वाढलेली असताना, दुसरीकडे आवक कमी झाली असल्याने भाज्यांच्या दरवाढीस सुरुवात झाली आहे. काही भाज्यांचे दर खूप वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
शेंगभाज्यांना मागणी वाढली आहे. या काळात घरगुती जेवणासह पितरांच्या नैवेद्यासाठीही या भाज्यांची खरेदी केली जाते. एकीकडे मागणी वाढलेली असताना आवक मात्र मर्यादित आहे. त्यामुळे घाऊक बाजारात या भाज्यांच्या दरात किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी पुढे किरकोळ बाजारात ग्राहकांना किलोमागे ४० ते ५० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. पुढील काही दिवस मागणी आणि आवक किती असेल यावर शेंगभाज्यांचे दर अवलंबून राहणार आहेत.