मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने जीवन संपवण्यामागे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. निंबाळकर यांच्या दोन पीएंनी डॉक्टर तरुणीसोबत बोलणे करून दिले होते. याच दबावातून तिने जीवन संपवल्याचा दावा दानवे यांनी केला. याप्रकरणी पोलीस अधिकारी महाडिक, निंबाळकर यांच्यासह त्यांची दोन्ही पीएंना आरोपी करून अटक करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले, मृत डॉक्टर तरुणीने डॉ. धुमाळ यांना लिहिलेल्या पत्रात तसे स्पष्टपणे म्हटले आहे. या पत्रात माजी खासदारांच्या राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक या दोन स्वीय सहायकांचा उल्लेख आहे, असे सांगत या दोघांनी डॉक्टर तरुणीचे माजी खासदाराशी बोलणे करून दिले. हा महिलेवर अन्याय असून तो अत्याचाराचा प्रकार असल्याचे सांगत या सगळ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असे दानवे म्हणाले.
दरम्यान, भाजपची सत्तेची ही मस्ती जनतेच्या समोर आली आहे. निंबाळकर यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर हे तहसील, प्रांंत, पोलीस अधिकाऱ्यांसोबत चोवीस तास वावरत असतात. त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर, गैर उत्खनन केले म्हणून याने वाठार निंबाळकर आणि वाखरी या गावातील शेतकऱ्यांवर 1 कोटी रुपयेपर्यंत बोजा चढवला आहे, असा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.
चौकशीसाठी सातारा जिल्ह्यातील अधिकारी नको!
हा सगळा प्रकार पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृहखात्याचा कारभार आहे, त्यांचे खात्याचे लोक कशाप्रकारे डॉक्टरांशी वागतात, हे दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये सत्तेचा माज दिसतो, असा संताप व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोणत्याही अधिकाऱ्याला नेमू नका, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.
घटनेचा सखोल आणि नि:पक्ष तपास करावा
माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, या घटनेचा शासनाने सखोल आणि नि:पक्ष तपास करावा मात्र, या प्रकरणाचे राजकारण करू नका, या घटनेचा फॉरेन्सिक पद्धतीने तपास होऊन, व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड्स यांचा बारकाईने तपास करावा. या खटल्याचा फास्टट्रॅक कोर्टामार्फत निकाल लवकर लावावा, अशी प्रतिक्रिया रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
पोलीस महासंचालक महिला असून महिलांची सुरक्षा धोक्यात ः संजय राऊत
मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण, मुंबईत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पोलीस खात्यावर हल्ला चढवला. पोलीस महासंचालक महिला असूनही महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. राज्यात पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा बोजवारा उडाला आहे. गृहमंत्र्यांचे लक्ष कायदा व सुव्यवस्था व महिलांच्या सुरक्षेकडे नसून विरोधकांवर कटकारस्थान करण्यात व्यस्त आहेत. त्यामध्येच त्यांनी पोलीस यंत्रणा अडकवून ठेवली आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली, तर मुंबईतही रस्त्यावर एका युवतीवर वार करून हत्या केली. या संदर्भात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, महिलांवर हल्ले होत असून सरकार असंवेदनशील व निष्क्रिय आहे. तसेच राज्यातील पोलीस महासंचालक महिला असूनही महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. तरीही त्या कार्यक्षम वाटत असल्याने मुख्यमंत्री त्यांना सातत्याने मुदत वाढवून देत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
राज्यात महिला सुरक्षित नसतील आणि महिलांचे खून आणि आत्महत्या होत असतील तर भाजपामधील त्या महान महिला कुठे गेल्या? त्या गप्प का आहेत? त्या कोणाची वाट पाहत आहेत, असे सवाल करत इतर कोणाचे सरकार असते तर या सत्ताधारी पक्षाच्या महिलांनी भररस्त्यात तांडव केले असते, असा घणाघाती हल्लाही राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार घडत असून अत्यंत असंवेदनशील पद्धतीने गृहखात्याचा कारभार सुरु आहे. गृहखाते फक्त विरोधकांवर पाळत ठेवणे, फोन टॅप करणे, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावण्याचे काम करीत आहेत. पण पोलीस हे आपले चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीने त्यांना राबविले जात असतील तर फलटण आणि मुंबईसारख्या घटना सतत घडत राहतील, असा इशाराही राऊत यांनी दिला.
मुंबईत आघाडीला बहुमत
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले, भाजप 150, शिंदे गट 120 आणि अजित पवार 100 पारचा नारा देत आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास पाहिल्यास आम्हाला राजकारणातून संन्यास घेऊन हरी, हरी... करत केदारनाथला जावे लागेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुंफेत जावे लागेल, अशी मिश्किली करत भाजपाने कितीही गर्जना केल्या तरी मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होईल, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. कुणाच्या टेकूशिवाय मनसे, शिवसेना आणि सहकारी पक्ष यांना 55 ते 60 टक्के मतदान होईल. आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, असा दावाही राऊत यांनी केला.