मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावर भर वर्दळीत एका व्यक्तीकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी रात्री एकाने लोखंडी रॉड सदृश्य वस्तू हातात घेत प्रवाशांना धमक्या दिल्याचे बोलले जात आहे. या तरुणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला स्टेशनवर बुधवारी रात्री ९.२० वाजता हातात लोखंडी रॉड सदृश्य वस्तू घेऊन साजिद अब्दुल करीम चौधरी, वय ४९ वर्षे हा प्रवाशांना धमकी देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याचे नाव साजिद अब्दुल करीम चौधरी असे असून तो मानसिक रुग्ण असल्याचे दिसून आले. मात्र रेल्वे स्टेशनवर गुन्हे वाढू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतले असून त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.