Parcel Scam: पार्सलच्या नावाने फोन, एक कोड आणि WhatsApp खाते हायजॅक; सायबर ठकांचा नवा डाव

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंसह अनेकांना लक्ष्य
Parcel Scam
Parcel ScamPudhari
Published on
Updated on

मुंबई: ‘तुमच्या नावाने पार्सल आले आहे, ते तुमचे नसल्याने परत पाठवायचे आहे,’ असा फोन करून नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा सायबर ठकांचा नवा फंडा समोर आला आहे. पार्सलची चौकशी करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर विशिष्ट कोड डायल करण्यास सांगितले जाते.

हा कोड डायल करताच मोबाईलवरील कॉल फॉरवर्डिंग सुरू होते आणि त्यानंतर व्हॉट्सॲपची पडताळणी करणारा दूरध्वनी आरोपींकडे वळवून थेट व्हॉट्सॲप खाते हायजॅक केले जाते.

या धक्कादायक प्रकारातून मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाही लक्ष्य करण्यात आले. व्हॉट्सॲप खाते ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नावाने परिचितांना पैशांची मागणी करणारे संदेश पाठविण्यात आले. मात्र, प्रकार लक्षात येताच भिडे यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना करून खाते पुन्हा ताब्यात घेतले. या घटनेत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, भिडे यांना एका व्यक्तीने फोन करून त्यांच्या नावाने पार्सल असल्याचे सांगितले. भिडे यांनी आपण कोणतेही पार्सल मागविले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आरोपीने एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.

Parcel Scam
Mumbai Water Shortage: ऑगस्ट संपला, तरी तलाव तहानलेलेच! तीन तलाव अजूनही भरायचे बाकी

यासाठी पाठविलेल्या संदेशात *21* नंतर मोबाईल क्रमांक आणि शेवटी # असा कोड होता. हा साधा क्रमांक नसून कॉल फॉरवर्डिंग सुरू करण्याचा आदेश होता. तो डायल केल्यानंतर भिडे यांच्या मोबाईलवर येणारे फोन दुसऱ्या क्रमांकावर वळविण्यात आले.

विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करा...

  • पार्सलबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क

  • मोबाईलवर विशिष्ट कोड डायल करण्याच्या सूचना

  • कोड डायल करताच मोबाईलवरील कॉल फॉरवर्डिंग

  • व्हॉट्सॲपच्या पडताळणीचा दूरध्वनी आरोपींकडे वळवून थेट व्हॉट्सॲप खाते हायजॅक

  • खाते ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नावाने परिचितांकडे पैशांची मागणी

व्हॉइस कॉलद्वारे व्हॉट्सॲपचा ताबा

कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्यानंतर आरोपींनी दुसऱ्या मोबाईलवर भिडे यांच्या क्रमांकावर व्हॉट्सॲप सुरू करण्याचा प्रयत्न केला. पडताळणीसाठी ‘व्हॉइस कॉल’चा पर्याय निवडण्यात आला. कॉल फॉरवर्डिंग सुरू असल्याने व्हॉट्सॲपचा पडताळणी कॉल आरोपींकडे पोहोचला. त्यातून आरोपींना व्हॉट्सॲप खाते ताब्यात घेता आले. या प्रकारात केवळ एका व्यक्तीचे खातेच धोक्यात येत नाही, तर संपर्कातील अनेक जणांची फसवणूक होत असते.

Parcel Scam
INS Nipun: भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस निपुण’ दाखल; खोल समुद्रातील मोहिमांना मिळणार मोठे बळ

सायबर ठकांचे ‘व्हीआयपी’ लक्ष्य

अशाच पद्धतीचा वापर करून शायना एन.सी., सुप्रिया सुळे, संबित पात्रा आणि अभिनेत्री वनिता खरात यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. वनिता खरात यांनी त्यांचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याची माहिती दिली होती.

त्यांच्या परिचितांकडे पैशांची मागणी करणारे संदेशही पाठविण्यात आले. माजी आमदार गीता जैन यांचे व्हॉट्सॲप खातेही अशाच पद्धतीने हॅक करण्यात आले होते. त्यांच्या सहाय्यकाला कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून एक कोड डायल करण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर जैन यांच्या क्रमांकावरून त्यांच्या परिचतांकडे पैसे मागणारे संदेश पाठविण्यात आले. या प्रकरणी नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

फंडा एकच : ‘कोड’ नकोच!

सायबर गुन्हेगार आता थेट ओटीपी मागण्याऐवजी नागरिकांकडूनच कॉल फॉरवर्डिंग सुरू करून घेण्याचा मार्ग वापरत आहेत. त्यामुळे ‘पार्सल आले आहे’ असा अनोळखी फोन आल्यास घाबरून कोणतीही प्रक्रिया करू नये. पार्सलची खात्री करा; मात्र मोबाईलवर आलेला कोणताही कोड डायल करू नका.

‘पार्सलचा फोन हा केवळ नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी वापरला जाणारा बहाणा आहे. नागरिकांनी कोणताही अनोळखी कोड डायल करण्यापूर्वी त्याचा उद्देश तपासणे अत्यावश्यक आहे.एका चुकीच्या कृतीमुळे व्हॉट्सॲप खाते आणि संपर्क यादी दोन्ही सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाऊ शकतात.’

- राहुल वर्षीकर, सायबर सुरक्षा तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news