

मुंबई: ऑगस्ट महिना संपला तरी, तलाव अजूनही तहानलेलेच आहेत. ठाणे जिल्ह्यातील भातसासह मध्य वैतरणा व नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा हे तीन तलाव अजून पाण्याने तुडुंब भरलेले नाहीत. त्यामुळे अजूनही मुंबईकरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार कायम आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव क्षेत्रात मागील दोन वर्षाच्या तुलनेत दीड हजार मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
परंतु अजूनही या तलावाने पाणी साठ्याचा ९० टक्के टप्पा ओलांडलेला नाही. हा तलाव ओसंडून वाहण्यासाठी अजून २३ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातही ३० हजार दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. मध्य वैतरणात तलाव भरत आला असला तरी अद्यापपर्यंत ओसंडून वाहू लागलेला नाही.
तलावातील पाणीसाठा ९५.९० टक्केवर पोहोचला असला तरी, शहरात १० टक्के पाणीकपात सुरूच आहे. भर पावसाळ्यातही मुंबईकर पाणीटंचाईचा सामना करत आहे. सध्याचा तलावांतील पाणीसाठा लक्षात घेता, ३० सप्टेंबरपर्यंत पाणीकपात सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सप्टेंबरमध्ये पाऊस तूट भरणार का?
पावसाळा आता केवळ एकच महिना राहिल्याने सप्टेंबर महिन्यात पाऊस आपली तूट भरुन काढणार का, असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात आहे.
पाऊस चांगला पडल्यास पाणीकपातीच्या संकटातून मुंबईकरांची सुटका होईल अन्यथा पाणीकपातीच्या संकटाचा वर्षभर सामना करावा लागण्याची शक्यता आहे.