

पनवेल: लग्नासाठी सतत तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढण्यासाठी तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केल्यानंतर मृतदेह पेट्रोल टाकून जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळखही पटत नसताना पोलिसांनी तांत्रिक तपास व कौशल्यपूर्ण चौकशीच्या जोरावर या खुनाचा उलगडा केला आहे.
११ एप्रिल २०२६ रोजी चिंचवली-वाकडी गावांच्या हद्दीतील वनविभागाच्या जागेत झुडपात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने महिलेची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी करलीस हवालदार सुनील कुदळे यांनी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात दाखल अनितादेवी राजभर (वय ३०) या बेपत्ता महिलेची माहिती मिळवली. तिच्या अंगावरील दागिने, हातातील धागा आणि शारीरिक बांधा हा सापडलेल्या मृतदेहाशी जुळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यानंतर अनितादेवीच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली असता करण नामदेव पाटील (वय २७, शिळफाटा, ठाणे) हा तिच्या सतत संपर्कात असल्याचे उघड झाले.पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो. निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक दिपक शेळके, हर्षल राजपूत,पोलीस अंमलदार सुनिल कुदळे, या पथकाने तपास सुरू केला.
पाटील चौकशीसाठी बोलावूनही हजर न राहिल्याने पोलिसांचा संशय बळावला. तांत्रिक तपासातून त्याचे व मृत महिलेचा संपर्क असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. अनितादेवी ही त्याच्याकडे वारंवार लग्नासाठी आग्रह धरत होती. तिच्यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आरोपीने ६ एप्रिल रोजी तिला एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कारमधून चिंचवली परिसरात आणून कारमधील पेट्रोल काढून मृतदेहावर टाकले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तो जाळून टाकला.
पुरावा नसताना पोलिसांनी उलगडले खुनाचे गूढ
याप्रकरणी करण नामदेव पाटील याला ८ जून रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोणताही पुरावा नसताना आणि मृत महिलेची ओळखही अज्ञात असताना पनवेल तालुका पोलिसांनी केलेल्या अथक तपासामुळे अखेर या थरारक खुनाचे गूढ उलगडण्यात यश आले आहे.