Mumbai Crime : पॅनकार्ड क्लबच्या ६४६.५८ कोटींच्या २११ मालमत्ता ईडीकडून जप्त

५१ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप
Pan Card Club case
Pan Card Club casepudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : पॅनकार्ड क्लब लिमिटेड आणि पॅनोरॅमिक समूहाशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार व मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) सुमारे ६४६.५८ कोटी रुपये किमतीच्या २११ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत.

जप्त मालमत्तांमध्ये व्यावसायिक कार्यालये, आलिशान हॉटेल्स, सुरू असलेली रिसॉर्ट्स, कृषी जमीन आणि निवासी मालमत्तांचा समावेश आहे. महाराष्ट्रासह केरळ, उत्तराखंड, गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि दादरा व नगर हवेली येथील मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Pan Card Club case
Mumbai investment fraud : आठ महिन्यांत ५,४८५ कोटींची आर्थिक फसवणूक; ८० गुन्हे दाखल

दरम्यान,यापूर्वी मे २०२५ मध्ये ईडीने अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि थायलंडमधील ३० मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या होत्या. त्यांचे मूल्य सुमारे ५४.३१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या या कारवाईनंतर या प्रकरणातील तात्पुरत्या जप्त मालमत्तांचे एकत्रित मूल्य ७००.८९ कोटी रुपये झाले आहे.

मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पुढे हा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने ३१ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईतील विशेष एमपीआयडी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. ईडीच्या तपासानुसार, पॅनोरॅमिक समूहाशी संबंधित व्यक्तींनी ४६ कंपन्यांचे जाळे उभारल्याचा आरोप आहे.

Pan Card Club case
Thane FDA action : दूध विक्री केंद्रांवर एफडीएचा बडगा

या कंपन्यांच्या माध्यमातून हॉटेलमधील मुक्कामाच्या रात्रींची विक्री आणि टाइमशेअर हॉलिडे मेंबरशिप योजनांच्या नावाखाली कथित पाँझी योजना चालविण्यात आल्या. अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून देशभरातील ५१ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आल्याचा आरोप आहे.

ईडीच्या माहितीनुसार, पॅनकार्ड क्लबने १९९७-९८ ते २०१७-१८ या कालावधीत गुंतवणूकदारांकडून सुमारे ९ हजार ५७७ कोटी रुपये जमा केले. त्यापैकी सुमारे २ हजार ८५८ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आले, तर २ हजार ३३२ कोटी रुपये एजंटांना कमिशन म्हणून दिल्याचे तपासात समोर आले आहे. उर्वरित ४ हजार ३८७ कोटी रुपये गुन्ह्यातून मिळालेली कथित कमाई असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

शेल कंपन्यांमार्फत निधी वळविल्याचा संशय

तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, गुंतवणूकदारांकडून मिळालेला निधी शगुन ट्रेडलिंक्स प्रायव्हेट लिमिटेडसह विविध शेल आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून फिरविण्यात आला. त्यानंतर हा पैसा पॅनोरॅमिक युनिव्हर्सल लिमिटेड आणि तिच्या देशांतर्गत तसेच परदेशातील उपकंपन्यांकडे वळविण्यात आल्याचा संशय आहे. या पैशातून भारतासह परदेशात महागड्या स्थावर मालमत्ता, रिसॉर्ट्स आणि व्यावसायिक जागा खरेदी केल्याचा आरोप आहे.

पनवेलमधील जमिनीच्या विक्रीचीही चौकशी

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कळ्हे गावातील ७.०८ हेक्टर जमीन सेबी आणि एमपीआयडी प्राधिकरणाच्या जप्ती आदेशांनंतरही विकण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. या व्यवहारासाठी मृत संचालिका उषा अरुण तारी यांच्या स्वाक्षरीचा कथित बनावट संचालक मंडळाचा ठराव वापरण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news