

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीर खोर्यातील पहलगामजवळ बैसरन येथे (Pahalgam terrorist attack) मंगळवारी (दि.22) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पर्यटकांचा अधिक समावेश आहे. तर अनेकजण जखमी झाले. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यांचे पार्थिव आज श्रीनगरमधून आणण्याची तयारी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी (दि.२३) दिली.
संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायंकाळी 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.