

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी संवेदनाशून्य राजकारणाचा कळस पाहायला मिळाला. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या विजयावरून सत्ताधारी बाके वाजवून अभिनंदन करण्यात मग्न असताना, महाराष्ट्रातील एका साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी ‘मौन’ पाळणे पसंत केले. यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला विरोधीपक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी धारेवर धरले.
लोकशाहीचा गळा घोटला जातोय
काँग्रेस नेते अशरफ आझमी यांनीही प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. एका लहान मुलीची हत्या होते आणि त्यावर सभागृह एक शब्दही बोलत नाही, ही महापालिकेची परंपरा नाही. भाजप आणि शिंदे गटाला केवळ स्वतःचे विजय साजरे करायचे आहेत. विरोधकांनी पेढे वाटले तर त्यांना परवानगी नाकारली जाते, ही कसली लोकशाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सत्ताधाऱ्यांची पळपुटी भूमिका ?
आजच्या कामकाजात एक अभूतपूर्व प्रसंग घडला. सत्ताधारी सदस्य अनुपस्थित असताना विरोधकांनी स्वतःचा कोरम पूर्ण करून कामकाज चालवण्याचा पवित्रा घेतला. मात्र, जेव्हा विरोधकांचे बहुमत स्पष्ट दिसू लागले, तेव्हा शिंदे गटाच्या नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. चर्चा करायची हिंमत नसल्यानेच सत्ताधारी पळाले, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला.
मुंबई महापालिकेत राजकारणाने माणुसकीचा पराभव केल्याचे चित्र दिसले. बंगाल विजयाच्या जल्लोषात महाराष्ट्रातील लेकीच्या किंकाळ्या दबल्या गेल्या, अशी संतप्त भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे. आता या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
तुमची माणुसकी मेली आहे का? किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ बंगालमध्ये ज्यांना तुम्ही वाघीण म्हणता, त्यांना हरवल्याचा आनंद तुम्हाला गगनात मावेनासा झाला आहे, पण आपल्याच महाराष्ट्रात साडेतीन वर्षांच्या लेकीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते, तिचं प्रेत शेणाच्या टोपलीत फेकलं जातं, याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का? सत्ताधारी बेभान होऊन पेढे वाटत आहेत, पण ज्या माय-लेकीचं घर उद्ध्वस्त झालं, त्यांना साधा आधार देण्याचं सौजन्यही प्रशासनाने दाखवलं नाही. ही अत्यंत शरमेची बाब आहे, अशी टीका पेडणेकर यांनी केली.