

मुंबई : ऑनलाईन महागड्या वस्तूंची हेराफेरी करुन कंपनीला गंडा घालणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पंकजकुमार हरिराम जिंदल, विजयकुमार महेंद्रसिंग सहारन, समशेरसिंग रघुविल आलान आणि सुमंतकुमार दाऊराम साहू या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. ते चौघेही हरियाणा आणि छत्तीसगढचे रहिवाशी आहेत.
त्यांच्याकडून पोलिसांनी दोन महागड्या कार आणि 34 लाखांचा महागड्या वस्तूंचा साठा असा 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हरियाणा येथून आलेले काहीजण ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन ऑर्डर करुन आतील महागड्या सामानाची अदलाबदल करून त्याजागी स्वस्त वस्तू ठेवून फसवणूक करत असल्याची माहिती एपीआय रोहन बगाडे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी युनिट आठच्या अधिकार्यांनी बोरिवलीतील चंदावरकर मार्ग, रिलायन्स डिजीटल स्टोरसमोर आलेल्या पंकजकुमार जिंदल, विजयकुमार सहारन, समशेरसिंग आलान आणि सुमंतकुमार साहू या चौघांना पोलिसांनी अटक केली.
त्यांच्या चौकशीत ते ई कॉमर्स कंपनीच्या डिलीव्हरी बॉयच्या मदतीने ऑनलाईन महागडे आणि स्वस्तात वस्तूंची ऑर्डर देऊन त्याची डिलीव्हरी नोंदणीकृत पत्त्यावर न घेता, त्रयस्थ ठिकाणी घेतात. डिलीव्हरी घेताना महागड्या वस्तूंच्या बॉक्सवरील बारकोड स्टिकर काढून, ते स्वस्त वस्तूंच्या बॉक्सवर चिटकवून अदलाबदल करत होते. अशा प्रकारे ही टोळी महागड्या वस्तूंची डिलीव्हरी न करता त्या परत करून कंपनीकडून रिफंडची रक्कम मिळवत होते. मात्र स्वस्त वस्तूंचे बॉक्स परत करुन कंपनीची फसवणूक करत होते.
लाखो रुपयांच्या वस्तूंचा अपहार
या टोळीने गेल्या काही महिन्यांत या ऑनलाईन कंपनीच्या वस्तूंची हेराफेरी करून लाखोंची फसवणूक केली. त्यांच्याकडून 34 लाख 9 हजार 333 रुपयांचे विविध इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक सामान, सात लाख रुपयांचा एक टाटा कंपनीचा टेम्पो, चार लाखांची एक हुंडाई कार असा 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.